जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेतून एका कर्मचार्‍याने भ्रमणध्वनीवरून माझ्याशी संपर्क साधला आणि त्याने सांगितले की, तुमच्याविरुद्ध मोठे षडयंत्र रचले गेले असून, तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकविले जाणार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील भ्रष्टाचारावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दूध संघातील लोणी (बटर) व दूध भुकटीतील भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी खडसे यांनी रात्रभर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर मंडप टाकून ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खडसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी चर्चेनंतर तूर्त आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. शनिवारी सायंकाळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, आपण म्हणू तेच खरे असे सांगतात. ते पोलिसांवर दबाव आणून नौटंकी करतात, तसेच दूध संघात भ्रष्टाचाराची प्रकरणे असून या प्रकरणी आपण दुसरी तक्रार व दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आमदार मंगेश चव्हाण आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला होता.

शनिवारी रात्री पुन्हा आ. खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधत उपरोक्त आरोप केले. मला स्थानिक गुन्हे शाखेतून एका कर्मचार्‍याचा फोन आला आणि त्याने सांगितले, तुमच्याविरुद्ध मोठे षडयंत्र रचले जात असून, तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जाणार आहे. तसेच हा कर्मचारी जामनेरचा असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. गुन्हा कोणत्या स्वरूपाचा, विषय नेमका कोणता याबाबत मात्र खडसे यांनी स्पष्टता केली नाही. एवढेच नव्हे; तर या षडयंत्राबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती असून काही अधिकार्‍यांचेही थेट बोलणे झाले असल्याचेही खडसे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत पोलीस दलातून कानोसा घेतला असता, असा कुठलाही प्रकार नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

आमदार खडसे यांनी, यापूर्वीच्या राजकारणातील घडलेले काही किस्सेही सांगितले. त्यावेळच्या राजकारणात वेगळेपण होते, खेळीमेळीचे वातावरण होते. विरोधकांशीही मित्रत्वाचे नाते होते. एकदा तर विरोधक असलेल्या विलासराव देशमुख यांची मोटार मी एरंडोलजवळ रोखून लाल दिवा फोडला. त्यावेळी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तत्पूर्वी विलासराव देशमुख यांनी पोलीस अधिकार्‍यांनाच धारेवर धरले होते. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी माझ्याविरुद्ध न्यायालयात असलेला खटला मागेही घेतला होता. याप्रकारचे अनेक किस्सेही त्यांनी सांगितले. सध्या अगदी घाणेरडे राजकारण सुरू आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader