नाशिक: संविधानाच्या मूळ प्रतीत छत्रपती शिवाजी महाराज, गुरुगोबिंद सिंग, गौतम बुद्ध, महावीर, श्रीराम अशी असंख्य चित्रे होती. ती नंतर काढण्यात आली. ही दैवते राष्ट्राचा स्वाभिमान आहे. त्यांची चित्रे समाविष्ट करून संविधानाची पुन्हा छपाई करावी, यासाठी विधीमंडळात तसा प्रस्ताव मांडावा, अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार पुरस्काराने रविवारी सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांना राज्यपाल बागडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान इंग्रजीत होते, असे नमूद केले. त्या संविधानाची छपाई नाशिकरोडच्या चलनी नोटा छापणाऱ्या मुद्रणालयात झाली होती.

मुद्रणालयातील वैद्य नामक व्यक्तीने त्याचे हिंदीत भाषांतर केले. छायाचित्र समाविष्ट असणाऱ्या संविधानाची एक प्रत आपल्याकडे असून ती शाळेत सर्वांना पाहण्यासाठी ठेवली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मूळ संविधानात जी चित्रे होती, ती पुन्हा समाविष्ट करून छपाई होणे आवश्यक आहे. त्यास कोण विरोध करते ते आपण पाहू, असा इशाराही बागडे यांनी दिला.

शहरी नक्षलवाद लोकशाहीसमोरील धोका -शेलार

शहरी नक्षलवाद हा लोकशाहीसमोरील सर्वात मोठा धोका आहे. समाजात फूट पाडणे, राष्ट्रवादी विचारधारेला पराभूत करणे आणि न्यायालय, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा आदी व्यवस्थेला चुकीचे ठरवून नष्ट करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होत आहेत. एखादा मोठा नेता पगडीवरून वाद निर्माण करून विभाजन करतो. काही सनातन धर्माला बोल लावतात. हिंदूहृदयसम्राटांचा पुत्र म्हणणारा यातील एक, असे सांगत सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता टिकास्त्र सोडले.