नाशिक – वादळी वाऱ्यासह वळिवाचा पाऊस हजेरी लावत असताना बुधवारी एकाच दिवशी जिल्ह्यात तीन बड्या नेत्यांच्या जाहीर सभा वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथे दुपारी होणाऱ्या सभेसाठी खास जलरोधक मंडपाची उभारणी करण्यात आली. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणारी सभा खुल्या मैदानात होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची वणी येथील मविप्र महाविद्यालयाच्या मैदानावर होणारी सभाही खुल्या मैदानात होईल. ठाकरे आणि पवार यांच्या सभेसाठी पावसापासून संरक्षणासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी २० मे रोजी मतदान होत आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महायुती व महाविकास आघाडीकडून प्रचाराचा धडाका लावला जात आहे. त्याच अंतर्गत बुधवारी तीन प्रमुख नेत्यांच्या सभा वेगवेगळ्या भागात होत असून त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष आहे. महायुतीचे नाशिक लोकसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीतील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार आणि धुळ्याचे भाजपचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथील शरदचंद्र पवार मुख्य बाजार आवारात सभा होत आहे.

हेही वाचा >>>नाशिक: कार्यकर्त्यांची धरपकड, शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; मोदींची बुधवारी पिंपळगावात सभा

पावसामुळे सभेत व्यत्यय येऊ नये म्हणून आवारात जलरोधक तंबुची उभारणी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी कांद्याचे लिलाव होतात, तिथे ही सभा होत आहे. दिंडोरीसह अनेक मतदार संघात कांदा निर्यातबंदी प्रचारात कळीचा मुद्दा ठरला आहे. सरकारने अलीकडेच सशर्त निर्यात खुली केली आहे. सभेत पंतप्रधान कांदा विषयावर काय बोलणार, याबद्दल उत्सुकता आहे.

महायुतीचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी सभा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी चालविली आहे. छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांनी मंगळवारी बाजार समितीत येऊन तयारीचा आढावा घेतला. सभेच्या दिवशी वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून पिंपळगाव बसवंत ते जोपुळेकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत बंद ठेवली जाणार आहे. पोलिसांनी बाजार समितीचा ताबा घेतला असून सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट व्यवस्था केली जात आहे.

हेही वाचा >>>तेजस गर्गे अद्यापही फरार, लाच प्रकरणातील संशयित

उद्धव ठाकरे, शरद पवार यांची खुल्या मैदानात सभा

महाविकास आघाडीचे नाशिक मतदारसंघातील उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होत आहे. मंगळवारी सायंकाळी व्यासपीठ उभारणीचे काम प्रगतीपथावर होते. खुल्या मैदानात ही सभा होत आहे. सभेची संपूर्ण तयारी झाली असून ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीतील अन्य नेते उपस्थित असतील, असे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे दिंडोरी मतदार संघातील उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ सलग दोन दिवस शरद पवार यांची अनुक्रमे वणी व मनमाड येथे जाहीर सभा होत आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता वणी येथील मविप्र संस्थेच्या महाविद्यालयाच्या मैदानात तर गुरुवारी सायंकाळी मनमाड बाजार समितीच्या प्रांगणात होणार आहे. या दोन्ही सभा खुल्या मैदानात होणार असल्याचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी सांगितले. सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बुधवारी येवला, मनमाड आणि चांदवड येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या सभांना कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of a special waterproof tent for narendra modi meeting in nashik district amy
Show comments