सीटू प्रणीत बांधकाम कामगार समन्वय समितीच्या वतीने राज्य कामगार आयुक्तांशी झालेल्या चर्चेनुसार बांधकाम कामगारांना साहित्यसामग्रीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये तसेच वैद्यकीय विमा येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सीटूचे पदाधिकारी डॉ. डी. एल. कराड यांनी येथे दिली. या संदर्भात अतिरिक्त कामगार आयुक्त व बांधकाम कामगार मंडळाच्या सचिवांना निवेदन देण्यात आले. विविध मुद्दय़ांवर यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यातील नाका कामगारांनाही मंडळात नोंदणी करण्यात येईल, तसेच जिल्ह्य़ातील लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील. यासाठी जिल्ह्य़ाला तातडीने निधी पाठविण्यात येईल, असे आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच बांधकाम कामगारांच्या पाल्यासाठी असलेल्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करणे, घरासाठी अनुदान, निवृत्तीवेतन या मागण्यांबाबत राज्यातील योजनांचा अभ्यास करून नवा प्रस्ताव मंडळासमोर सादर करण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, पुणे, जालना, नागपूर, वर्धा, धुळे, यांसह अनेक जिल्ह्य़ांतील मंडळांमध्ये नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांची अंत्यसंस्कार योजना, बाळंतपण आर्थिक सहाय्य, शिष्यवृत्ती, मयत कामगारांच्या वारसांचे लाभ, अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. या सर्व नाकर्तेपणाविरुद्ध कामगारांमध्ये तीव्र असंतोष होता. तो व्यक्त करण्यासाठी राज्यातील १० हजार कामगारांनी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चाही काढला. मोर्चाच्या वेळी दिलेली आश्वासने कामगारमंत्री व बांधकाम कामगार मंडळाने त्वरित पूर्ण करावीत अन्यथा कामगारमंत्र्यांच्या घरावर विनासूचना आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. कराड यांनी दिला.

Story img Loader