नाशिक – भोंदुबाबाकडून झालेल्या फसवणुकीविरोधात नाशिकमधील एका महिलेने खंबीरपणे लढत न्याय मिळवला. तक्रारदार महिलेला मूळ रकमेसह दंड स्वरुपातील रक्कम आणि त्रासापोटी भरपाई देण्याचा आदेश नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने भोंदुबाबाला दिला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा पथदर्शक निर्णय असल्याचे म्हटले आहे.
शहरातील उंटवाडी परिसरातील एका महिलेने कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी समाज माध्यमाव्दारे उत्तर प्रदेशातील करौली येथील लवकुश आश्रमाचे महाराज संतोषसिंग भदोरिया यांच्याशी संपर्क केला. महिलेच्या कुटूंबातील सदस्यांना भूतबाधा झाल्याचे सांगून एका दिवसाच्या उपचारासाठी दोन लाख ५१ हजार रुपये भोंदुबाबाने मागितले. सदर रक्कम बँक ऑफ बडोदामार्फत आरटीजीएसने संबंधित महिलेने पाठविले. पैसे पाठविल्याचा महिलेकडे पुरावा होता. भोंदुबाबाने आश्रमात बसून ऑनलाईन विधी केल्याचे सांगितले. परंतु, त्याचा महिला आणि तिच्या कुटूंबियांना कोणताच फरक पडला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने भोंदुबाबाकडे रक्कम परत करण्याची मागणी केली असता बाबाने नकार दिला.
महिलेने ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चा आधार घेऊन नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने पडताळणी करुन भोंदुबाबाने महिलेची फसवणूक केल्याचे स्पष्ट केले. भोंदुबाबाने महिलेस मूळ रक्कम दोन लाख ५१ हजार रुपये २८ फेब्रुवारी २०२३ पासून ते रक्कम मिळेपर्यंत दरसाल दर शेकडा १० टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले. तसेच दंड म्हणून ५० हजार रुपये आणि शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने १५ हजार रुपये महिलेस देण्याचे आदेश दिले. महिलेचा तक्रार अर्जाचा खर्च सात हजार रुपये देण्यासही सांगितले. या निर्णयाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नाशिकने स्वागत केले आहे. अशा प्रकारे फसविल्या गेलेल्यांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.
सामान्य लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अनेक बाबा खोटे आमिष दाखवून फसवणूक करतात. बऱ्याच वेळा भोंदुबाबा परप्रांतीय असल्याने न्याय मिळण्याची अपेक्षा नसते.. परंतु, हा निर्णय पथदर्शक असल्याने अशा भोंदुबाबांवर अंकुश बसेल. अशा प्रकारे फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे – कृष्णा चांदगुडे (राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस)