धुळे – विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी बुधवारी जिल्ह्यात पहाटेपासून प्रशासनाकडून तयारी सुरु झाली असताना शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे एक संशयास्पद कंटेनर ताब्यात घेतला. या कंटेनरमध्ये पोलिसांना चांदीच्या ३३६ विटा आढळल्या असून त्यांची किंमत ९४ कोटी ६८ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. हा ऐवज एचडीएफसी बँकेचा असल्याचे प्रथमदर्शी म्हटले जात असून यासंदर्भात पोलिसांकडून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला
हेही वाचा – नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदारांचा अधिक उत्साह
हा सर्व किंमती ऐवज चेन्नईहून जयपूरकडे नेला जाणार होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माहिती दिली. शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी बुधवारी पहाटे पाच वाजता ही कारवाई केली. हा ऐवज पोलिसांनी अद्याप जप्त केलेला नाही. यासंदर्भात संबंधित एचडीएफसी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात येईल आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यात येईल. खात्री झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत कंटेनर तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहे. तपास अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे तपासण्याचे काम हाती घेतले आहे. कंटेनरमध्ये प्रत्येकी ३० किलो वजनाची एक अशा ३३६ विटा आढळल्या आहेत. मतदानाच्या दिवशीच ही कारवाई करण्यात आल्याने वेगळीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.