शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दिवसेंदिवस ठेकेदार व प्रशासनाकडून मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
२००८ पासून हे कंत्राटी कर्मचारी अल्प मानधनावर कार्यरत आहेत. २५ ऑगस्टला कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संघटना स्थापन केली असता १ सप्टेंबरच्या रात्री ठेकेदाराच्या माणसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ केली. या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आल्यावरही त्यांच्याविरुद्ध कार्यवाही झाली नाही. १२ सप्टेंबर रोजी काही कर्मचाऱ्यांचे मोबाइल जमा करण्यात आले. त्यानंतर तीन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यापैकी एक कर्मचारी तीन दिवस दवाखान्यात व सहा दिवस घरी होता. स्वत: ठेकेदाराने हे दिवस भरून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते दिवस भरून देण्यात आले नाहीत. त्या दिवसापासून जे संघटनेचे सभासद आहेत त्यांचा मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
काही कर्मचाऱ्यांचा वारंवार अपमान केला जातो. कंत्राटी कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार प्रशासनाकडून स्वीकारली जात नाही. उलट ठेकेदाराचेच प्रशासन या रुग्णालयात चालत आहे. आजपर्यंत आपला भविष्य निर्वाह निधीही जमा करण्यात आलेला नाही. वेळेवर पगार दिला जात नाही, किमान वेतन दिले जात नाही, अशा तक्रारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. एका ठेकेदाराचे बहुतेक कर्मचारी दिवसा त्याच्याकडे काम करत असल्याने केवळ रात्रपाळीत रुग्णालयात काम करतात. परंतु,बाहेर काम करणाऱ्या व संघटनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत मात्र बदल करण्यात आला. त्रास देत १५ ते २० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. भद्रकाली पोलीस ठाणे, प्रशासन, आयुक्त यांच्याकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.