नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला प्रशासनाकडून वेग देण्यात येत असताना साधू, महंतांमधील वादविवादालाही सुरुवात झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथील शैव आखाड्याने नाशिकचे महंत सुधीरदास यांच्या महंताईवर आक्षेप घेतला आहे. सुधीरदास यांनी मात्र, हे आक्षेप फेटाळून लावले आहेत.त्र्यंबकेश्वर येथील शंकरानंद सरस्वती महाराज यांनी महंत सुधीरदास यांच्या महंताईवर आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. महंत सुधीरदास यांनी सर्व आक्षेप खोडून काढले.

११ एप्रिल २००४ रोजी आपण निर्वाणी आखाडा खालसाचा श्री महंत झालो, याबाबत संबंधितांची स्वाक्षरी असलेले पत्र तसेच अन्य पुरावे आहेत. महंताई रद्द झाली असेल तर त्या आखाड्याने तसे पत्र आपणास द्यायला हवे होते. मात्र ते पत्र अद्याप आपल्याकडे आलेले नाही. उलट आखाड्याकडून दिले जाणारे सन्मानपत्र आपल्याकडे आहे. वास्तविक, शैव आखाड्यांशी आमचा काही संबंध नाही, आमचा वैष्णव आखाडा आहे, असे महंत सुधीरदास यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर येथील शैव आखाड्यांकडून नाशिक हे कुंभाचे स्थान नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्याविषयी आम्ही प्रतिक्रिया दिली. ही वर्चस्ववादाची लढाई आहे. बनाव रचला जात आहे. कोणावर आरोप न करता एकत्र येऊन आदर्शवत कुंभमेळा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदच अस्तित्वात नसल्याचा दावा केला. प्रयागराज मधील कुंभमेळ्यात आखाडा परिषद अस्तित्वात नव्हती. त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बैठकीस अखिल आखाडा परिषदेचे नाव देणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.