नाशिक – अंबड परिसरातील माणिक नगर येथील अतिक्रमित प्रार्थनास्थळ पोलिसांनी दबावामुळे पाडल्याचा आरोप करुन मारहाण करणाऱ्या उपनिरीक्षकाच्या बदलीसाठी नागरिकांनी मंगळवारी अंबड पोलीस ठाण्यात ठाण मांडले. पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.
सोमवारी दुपारी साडेबारा ते एक या वेळेत अंबड पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून माणिक नगर येथील भाजी मार्केट परिसरात पोलीस पोहोचले. त्याठिकाणी रहिवाशांनी बांधलेले प्रार्थनास्थळ काही नागरिकांनी दबाव आणून पोलिसांना पाडण्यास भाग पाडल्याचा इतरांचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. परिसरातील नागरिकांनी मंगळवारी अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी केली. अंबड पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिकांनी निलंबनाची मागणी लावून धरली. पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा – नाशिक : महामार्गावर लुटमार करणारे तीन सराईत ताब्यात
दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी भूमिका मांडली. भाजीपाला विकण्याच्या ठिकाणी ओट्यावर काही महिला या प्रार्थनास्थळ तयार करण्याचा प्रयत्न करत होत्या. इतर व्यावसायिकांनी त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. महापालिका अधिकाऱ्यांनी काढून टाकण्यास सांगितल्याने ते अतिक्रमण हटवण्यात आले. पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचे आरोप आहेत. परंतु, त्यासंदर्भात, सोमवारी कोणीही तक्रार केली नाही. त्या ठिकाणी १० ते १५ कर्मचारी होते. नागरिकांच्या तक्रारींनुसार घडलेल्या प्रकाराची शहानिशा केली जाईल, असे ठाकूर यांनी नमूद केले.