नाशिक : श्री गंगा गोदावरी आरतीचा उपक्रम समस्त हिंदू समाजाला समरसतेचा संदेश देणारा ठरावा, अशी श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची सर्वसमावेशक भूमिका आहे. त्यामुळे १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गोदाकाठावर गंगा आरती होईल. कोणी विरोधासाठी लाठ्या आणल्यास प्रसाद समजून स्वीकार करण्यात येईल. या वादाचे कारण आर्थिक निधीची जमवाजमव असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी केला.
गंगा गोदावरी पुरोहित संघ आणि साधू, महंतांनी गंगा आरती उपक्रमावरून श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीला विरोध दर्शवला आहे. या बाबत समितीचे अध्यक्ष गायधनी यांनी बुधावारी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. गंगा गोदावरी आरती उपक्रमाव्दारे नाशिकसह गोदावरी तीरावरील विविध गावांमधील सर्व समाजाला पुढे नेण्याचा समितीचा प्रयत्न आहे. गोदावरी आरतीचा उपक्रम संपूर्ण समाजाचा असून त्या निमित्ताने सामाजिक समता आणि समरसतेचा संदेश संपूर्ण समाजात पसरावा, त्यातून समाजकल्याणाची प्रेरणा मिळावी हा समितीचा उद्देश आहे. स्थानिक विरूध्द बाहेरचा अथवा कोणत्याही राजकीय हस्तक्षेपात आरती अडकू नये. समितीमध्ये कोणीही उपरे नाही. समितीमधील तीनहून अधिक तीर्थ पुरोहित असल्याचे गायधनी यांनी सांगितले.
हेही वाचा…नाशिक : अजून एका माजी मंत्र्याचा उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र
जुलैमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत समितीची बैठक झाली होती. त्यांनी समितीच्या कामकाजाविषयी दिशा स्पष्ट करतांना शासकीय निकष काय असावेत, ते सांगितले होते. त्यानुसार समितीच्या वतीने ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
समिती सदस्यांनी काशी, अयोध्या, वृंदावन व अन्य ठिकाणी जाऊन होणाऱ्या महाआरतीचा अभ्यास केला आहे. नाशिक गोदाकाठावर आरती करण्यासाठी स्थान निश्चित केले. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना गोदाकाठावरील मंदिराचा, कुंडांचा इतिहास समजावा, यासाठी मार्गदर्शक नेमण्यात यावेत, महिला पुरोहितांचा पूजा, आरतीच्या कामात सहभाग असावा, यासह अन्य काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याबाबत वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये पुरोहित संघही उपस्थित होता. काही वेळा अनुपस्थिती राहिली. महाआरतीसाठी दर महिन्याला येणाऱ्या ५० ते ६० हजार रुपयांच्या खर्चासाठी निधी संकलनाचा मुद्दा पुढे आल्यापासून वादाला सुरूवात झाल्याचा दावा गायधनी यांनी केला.
हेही वाचा…नाशिक : स्थानिक पातळीवर काँग्रेस बळकटीसाठी बैठका
पुरोहित संघाने निधी संकलन केल्यावर ते पैसे संघाकडेच जमा करण्याची सूचना केली होती. वास्तविक एक संस्था दुसऱ्या संस्थेकडे निधी का देईल, असा प्रश्न गायधनी यांनी उपस्थित केला. समितीला शासकीय मान्यता आहे. आरती सुरू केल्यास वंश परंपरागत पुरोहितांच्या अधिकाराला बाधा येणार नाही. पुरोहित संघाच्या व्यवसाय, रोजगारात हस्तक्षेपाची समितीची इच्छा नाही. प्रतीक शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी व्हॉट्स अपवरून राजीनामा दिला आहे. त्याला राजीनामा का म्हणायचे, असा प्रश्नही गायधनी यांनी केला.
श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समिती १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दुतोंड्या मारूतीजवळ महाआरती करणार आहे. यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना निमंत्रण दिले आहे. आरतीला स्वामी सखा, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, शहर परिसरातील संत, महंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना गौरवण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमही होतील.
हेही वाचा…गोदा महाआरतीवरून संघर्ष शिगेला; अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे शासन, प्रशासनाला पत्र
सर्व समावेशक म्हणजे काय ?
पुरोहित संघाने आजवर गोदाआरतीत कुठलाही जातीभेद केलेला नाही. यामुळे पुरोहित संघाला सर्वांचा पाठिंबा आहे. आजवर पुरोहित संघाने स्वखर्चाने गोदाआरती केली. आर्थिक देवाण-घेवाणचा विषय येतो कुठे ? सुधीर मुनगंटीवार यांनी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यापासून या वादाला सुरूवात झाली. अनुभव नसलेले गोदा आरतीविषयी बोलत आहेत. आम्ही त्यांना आरतीच्या नियोजनात सन्मानपूर्वक बोलवत आहोत. – सतीश शुक्ल (श्री गंगा गोदावरी पुरोहित संघ)
हेही वाचा…चित्रपटाप्रमाणे थरार… जेव्हा महिला तहसीलदारांच्या वाहनाचा दुचाकीस्वारांकडून पाठलाग होतो
आर्थिक गुंतागुंत
महाराष्ट्र सरकारने तीर्थ विकासासाठी ५६ कोटी मंजूर केले होते. मात्र गोदाआरतीवरून झालेला वाद पाहता हा निधी वर्ग न होता परत गेल्याची चर्चा आहे. आता हे वाद सुरू राहिले तर गोदाआरतीसाठी मिळालेले ११.६७ कोटी रुपयेही परत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.