नाशिक – पैठणी, सोन्याची नथ, उंची वस्त्रे आणि पैशांची पाकिटे, आदी प्रलोभनांनी गाजलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी केंद्राबाहेर उघडपणे पैसे वाटपामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडली. एका उमेदवाराच्या समर्थकांना मतदान केंद्राबाहेर पैसे वाटप करताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अनेक ठिकाणी महिला व पुरुषांकडून असे पैसे वाटले गेले असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. प्रलोभनांची चर्चा होत असताना दुसरीकडे मतदान केंद्रांवर सकाळपासून शिक्षक मतदारांनी अक्षरश: रांगा लावल्या होत्या. सायंकाळी पाचपर्यंत ८४.८६ टक्के मतदान झाले होते.

पाच जिल्ह्यांच्या मतदारसंघात सकाळी सातपासून विभागातील ९० केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. त्यात नाशिक जिल्ह्यातील २९, अहमदनगर २०, जळगाव २०, धुळे १२ आणि नंदुरबार जिल्ह्यातील नऊ केंद्रांचा समावेश आहे. निवडणुकीच्या रिंगणात २१ उमेदवार असून शिवसेनेचे (शिंदे गट) किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, भाजपशी संबंधित अपक्ष विवेक कोल्हे या चौघांमध्ये मुख्य लढत आहे. शहरातील मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय, बी. डी. भालेकर विद्यालयासह अन्य केंद्रांवर सकाळपासून मतदारांचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. पहिल्या चार तासांत म्हणजे सकाळी सात ते ११ या वेळेत संपूर्ण विभागातील १६ हजार ६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८४.८६ टक्के मतदान झाले होते. मतदारसंघात एकूण ६९ हजार ३६८ मतदार आहेत. सायंकाळी पाचपर्यंत ५८ हजार ८६९ मतदारांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली. यात ३८ हजार ९५३ पुरूष तर १९ हजार ९१८ महिला मतदारांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात ४८६७ मतदार (९०.२५ टक्के), धुळे ७०६५ (८६.२५ टक्के), जळगाव १०९७१ (८३ टक्के), नाशिक २१५९६ (८५.३५ टक्के), अहमदनगर १४३७० मतदार (८२.६२ टक्के) मतदान झाले. आपले हक्काचे मतदान करुन घेण्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांची शेवटच्या क्षणापर्यंत धडपड सुरू होती.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
uddhav thackeray prakash ambedkar (2)
“गरज सरो वैद्य मरो”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; म्हणाले, “तुमचे पक्ष वाचवण्यात…”
Tukaram mundhe
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, ‘या’ खात्याचा पदभार स्वीकारण्याचे मंत्रालयाकडून आदेश!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
rudra the practical school nashik marathi news
विद्यार्थिनीच्या मृत्युनंतर दिवसभर शाळा बंद, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे आंदोलन
eknath shinde narendra modi
“भाजपाने आमच्याबरोबर दुजाभाव केला”, शिंदे गटाची खदखद; मंत्रिपदावरून एनडीएत वाद पेटला?

हेही वाचा >>>विद्यार्थिनीच्या मृत्युनंतर दिवसभर शाळा बंद, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे आंदोलन

पैसे वाटप करणारे पोलिसांच्या ताब्यात

मतदारांना विविध प्रकारचे प्रलोभन दाखविले गेल्याच्या तक्रारी आधीच निवडणूक यंत्रणेकडे आल्या होत्या. मतदानाच्या पूर्वसंध्येला मनमाड, येवला व नंदुरबार येथे मोठ्या प्रमाणात रोकड पकडण्यात आली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी त्याची पुनरावृत्ती झाली. बी. डी. भालेकर शाळेच्या केंद्राबाहेर एका उमेदवाराच्या समर्थकांकडून मतदारांना पैशांची पाकिटे दिली जात असल्याचा आरोप करुन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीला पकडून भद्रकाली पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयिताकडून विविध पाकिटात ठेवलेली ६९ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ठाकरे गटाचे नेते वसंत गिते, महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. एकाच उमेदवाराचे पैसे सर्वत्र पकडले गेल्याकडे गिते यांनी लक्ष वेधले. महिलाही पैसे वाटपात सहभागी आहेत. मागील निवडणुकीत भ्रष्टाचार करून निवडून आलेली मंडळी पुन्हा पैसे वाटप करीत असल्याचा आरोप गिते यांनी केला. निवडणूक आयोगाने दुजाभाव न करता याची चौकशी करावी. तीन महिला व एक पुरुष पैसे वाटप करीत होते. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी पैसे वाटप होणे हे लांच्छनास्पद आहे. पैसे वाटपाच्या चित्रफिती यंत्रणेकडे स्वाधीन करण्यात आल्या असून अशा प्रकारे निवडणूक होणार असेल तर, तिला काय अर्थ राहील, असा प्रश्न विलास शिंदे यांनी केला.

आरोप तथ्यहीन

पैसे वाटपाविषयी करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. मतदानाच्या दिवशी आपण संपूर्ण दिवसभर येवल्यात होतो. कुठे काय घडले, मतदारांना पैसे वाटताना कोण पकडले गेले, हे आपणास तुमच्या माध्यमातून समजले. पैसे वाटपाशी आपला कुठलाही संबंध नाही. विरोधकांचे आरोप करणे हे काम आहे. असे प्रकार आपण कधीही केलेले नाहीत. – किशोर दराडे (उमेदवार, शिवसेना शिंदे गट)