नाशिक – अश्रुंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते, वेड्याचं घर उन्हात, अशी उत्तमोत्तम ४१ नाट्यसंपदा मराठीला देणारे ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या अप्रकाशित साहित्यावरून वाद उद्भवला आहे. मराठी चित्रपटांची कानेटकर लिखीत संहिता विक्रीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कानेटकर कुटुंबियांनी आक्षेप घेतला असताना संबंधित संहितेचे लिखीत हक्क आमच्याकडे असून ते कुटुंबियांना सादर केले जातील, अशी भूमिका जाहिरात देणाऱ्यांनी घेतली आहे.
‘कै. वसंतराव कानेटकर लिखीत आजच्या परिस्थितीला अचूक लागू पडेल, अशी मराठी चित्रपटांची संहिता उपलब्ध आहे, ती विकत घेण्यात रस असेल त्यांनी संपर्क साधावा’ अशी जाहिरात शहरातील एका दैनिकात गुरुवारी प्रसिध्द झाल्याने कानेटकर कुटुंबियांना धक्का बसला. कारण, प्रा. कानेटकर यांनी लिहिलेल्या सर्व साहित्याचे हक्क कुटुंब वगळता अन्य कुणाकडे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या परिस्थितीत साहित्याची परस्पर कुणीतरी विक्री करीत असल्याचे त्यांना वाटते. प्रा. कानेटकरांना त्यांच्या हयातीत ‘तोतया कानेटकर’चा सामना करावा लागला होता. मृत्यू पश्चातही त्यांच्या साहित्य संपदेचा हा फेरा चुकला नसल्याची साशंकता कुटुंबियांकडून व्यक्त झाली.
हेही वाचा >>> College Girl Suicide : नाशिकमध्ये वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
संहिता विक्रीची जाहिरात प्रसिद्ध सारडा उद्योग समूहामार्फत देण्यात आली होती. या समूहाचे प्रमुख किसनलाल सारडा आणि प्रा. वसंत कानेटकर यांचे अतिशय निकटचे संबंध होते. साधारणत: ४० वर्षांपूर्वी चित्रपटाची ही संहिता सारडा यांनी मानधन देऊन प्रा. कानेटकरांकडून लिहून घेतल्याचे सांगितले जाते. चित्रपट संहितेची हस्तलिखीत प्रत आणि प्रा. कानेटकर यांनी दिलेले हक्क आमच्याकडे असून त्या आधारावर संहिता विक्रीची जाहिरात दिल्याचे सारडा उद्योग समुहाने म्हटले आहे.
हेही वाचा >>> नाशिक : विहिरीत तीन विद्यार्थ्यांना फेकून मारण्याचा प्रयत्न – संशयित ताब्यात
उद्योगपती सारडा कुटुंबियांशी आमचे स्नेहाचे संबंध निश्चित आहेत. मात्र, प्रा. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या सर्व संहिता प्रकाशित असो वा अप्रकाशित, फक्त अंजली कानेटकर यांच्याच कायदेशीर मालकीच्या आहेत. प्रा. कानेटकर यांचे कोणत्याही प्रकारचे साहित्य अन्य कोणत्याही व्यक्ती वा संस्थेकडे नाही. आपल्या परवानगीशिवाय या साहित्याची विक्री किंवा खरेदी बेकायदेशीर ठरेल. – अंजली कानेटकर (प्रा. वसंत कानेटकर यांच्या स्नुषा)
प्रा. वसंतराव कानेटकर यांच्याशी आपले चांगले संबंध होते. त्यांच्या कुटुंबियांशीही वाद करण्यात आम्हाला स्वारस्य नाही. आमच्या सांगण्यावरून अंदाजे चार दशकांपूर्वी ही चित्रपट संहिता प्रा. कानेटकर यांनी लिहिली होती. त्याची मूळ प्रत आणि तिचे हक्क लिखीत स्वरुपात त्यांनी आपल्या स्वाधीन केलेले आहेत. त्यासंबंधीची कागदपत्रे कानेटकर कुटुंबियांना सादर केली जातील. –किसनलाल सारडा (प्रमुख, सारडा उद्योग समूह)