जळगाव – शहरात प्रार्थनेसह प्रवचनाच्या नावाखाली धर्मपरिवर्तन केले जात असल्याच्या संशयाने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चौकशीसाठी चारजणांना ताब्यात घेतले आहे. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जळगाव- भुसावळ महामार्गावरील कालिंकामाता मंदिर परिसरातील मंगलम लॉन्सच्या सभागृहात जमलेल्या सुमारे ४० जणांसमोर प्रार्थना व प्रवचनाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होता. आमच्या धर्मात प्रवेश केल्यानंतर तुमचे सर्व रोग दूर होतील, असा प्रचार आणि हिंदू धर्माबाबत अपप्रचार सुरू असल्याचे बघून कीर्तनकार तथा कथाकार योगेश कोळी यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा – नाशिक : औद्योगिक प्रश्नांवर आता एकत्रित लढा; संघटनांचा निर्णय
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सिना पाटील (४१, कोल्हे हिल्स, जाणता राजा शाळेजवळ, जळगाव, मूळ रा. केरळ), पवनक सारसर (२५, रा. मन्यारखेडा, जळगाव), राजकुमार यादव (४७, रा. खेडी, मूळ रा. उत्तर प्रदेश), प्रदीप भालेराव (४९, रा. वाघनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.