नाशिक: जिल्ह्यात करोनाचे तीन रुग्ण आढळले असून त्यातील त्र्यंबकेश्वर येथील महिलेची आरटीपीसीआर चाचणी सकारात्मक आली तर सिन्नर तालुक्यातील दोन रुग्ण संशयित आहेत. त्र्यंबकेश्वर येथील ज्या महिलेची चाचणी सकारात्मक आली, तिची प्रकृती सुधारत आहे. करोना विषाणूचा हा नवीन उपप्रकार जेएन- १ आहे की नाही, याची स्पष्टता होण्यास वेळ लागणार आहे. संबंधित महिलेचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.
राज्यातील काही भागात करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन-१ चे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिला ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झाली होती. सर्दी जाणवत असल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी तिची आरटीपीसीआर चाचणी केली होती. या चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात संबंधित महिला सकारात्मक असल्याचे निष्पन्न झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले. करोनाचा विषाणू नवीन की जुना, याची स्पष्टता झालेली नाही. संबंधित नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. त्यानंतर ते लक्षात येईल, असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले. संबंधित महिला रुग्ण आणि बाळाची प्रकृती चांगली आहे. तिच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांची चाचणी केली जाणार आहे. संबंधितांच्या गावात आवश्यक ती दक्षता घेतली जाणार आहे. करोनाबाधित महिलेला लवकरच घरी सोडले जाईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा… नाशिक : धार्मिक पर्यटनाने अर्थव्यवस्थेला चालना, नियोजनाअभावी त्र्यंबकला भाविकांचे हाल
सिन्नर तालुक्यात करोनाचे दोन संशयित रुग्ण आढळल्याने नागरिक धास्तावले आहेत. सिन्नर शहरातील एक ६० वर्षाची व्यक्ती आणि सुरेगाव येथील ३६ वर्षाची महिला हे संशयित रुग्ण आहेत. दोघांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले. सर्दी, खोकला असा त्रास असल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नाशिक शहरात अद्याप करोना संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. महानगरपालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय व नाशिकरोड येथील रुग्णालयात अशा रुग्णांवर उपचारासाठी तयारी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडे चाचणीसाठी पुरेसे संचही उपलब्ध असल्याचे आरोग्यधिकारी डॉ. तानाजी वाघ यांनी सांगितले.