नाशिक: चारचौघांसारखं वैवाहिक आयुष्य असावं असं स्वप्न सारेच पाहतात. मात्र करोनाच्या पहिल्या आणि दुस ऱ्या लाटेत अनेकांचे हे स्वप्न आसवांमध्ये वाहून गेलं. संसाराच्या वाटेवर अनेकांनी साथ सोडली. येथील रुपाली झाल्टे त्यापैकी एक. चंद्रकांत पालवे यांनी रुपाली यांच्यापुढे आयुष्याची साथीदार होण्यासाठी प्रस्ताव ठेवला. दोन्ही कुटुंबांनी या प्रस्तावाला होकार दिल्याने दोन बालकांना मायेचे छत्र मिळाले.
करोनाच्या पहिल्या आणि दुस ऱ्या लाटेत करोनात बळी गेलेल्यांची संख्या कितीतरी अधिक होती. त्यात युवा वर्गाचे प्रमाण लक्षणीय राहिले. औषधोपचाराभावी, भीतीने या काळात अनेकांचा मृत्यू झाला. या काळात पती गमावलेल्या महिलांची स्थिती अतिशय दयनीय झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्या, डोक्यावर औषधोपचारासाठी झालेला खर्च, कर्ज या चक्रव्युहात या महिला अडकल्या. काहींना यातून बाहेर पडण्यासाठी नातेवाईक-मित्र परिवाराची खंबीर साथ मिळाली तर काही या गर्तेत खोलवर रुतत गेल्या.
लासलगाव येथील पूर्वाश्रमीच्या रुपाली झाल्टे यापैकी एक. त्यांचे पती सहकारी बँकेत कामास होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर रुपाली यांच्यावर दोन वर्षाची चिमुकली शर्वरीसह अन्य जबाबदा ऱ्या अंगावर आल्या. रुपाली यांना आई-वडील नसल्याने मामांनी रुपाली यांची जबाबदारी स्विकारत पुनर्विवाह करुन देण्याचे ठरविले. रुपाली यांच्या सासरच्या मंडळींनीही याला संमती दिल्याने त्यांच्यासाठी वर संशोधन सुरू झाले. करोना एकल समितीच्या मदतीने ही मोहीम सुरू राहिली.
याच काळात नातेवाईकांतर्फे नाशिक येथील चंद्रकांत पालवे यांचे स्थळ सुचविण्यात आले. चंद्रकांत यांचा घटस्फोट झाला असून त्यांना ११ वर्षाचा सम्यक हा मुलगा आहे. ते खासगी कंपनीत उच्च पदावर काम करत आहे. चंद्रकांत यांचे स्थळ सर्वांच्या पसंतीला पडले. शर्वरीसह रुपालीचा स्वीकार केल्याने सर्वांना आनंद झाला. नुकतेच दोघेही विवाहबध्द झाले. या निर्णयामुळे शर्वरी आणि सम्यक यांना हक्काचे आई-बाबा मिळाल्याने दोन्ही कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे. करोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने दोघांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.