मालेगाव : सलग तीन दिवसात केवळ एक रुग्ण आढळून आल्याने शहराला काहीसा दिलासा मिळाला असतांनाच मालेगाव शहर आणि तालुक्यात बुधवारी एकाच दिवसात २६ आणि गुरुवारी सहा नवे रुग्ण आढळून आल्याने पुन्हा धाकधूक वाढली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सात पोलीस आणि एका पत्रकाराचा समावेश आहे.
रविवारी येथे करोनाचा एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सोमवार आणि मंगळवारी एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याने लोकांना दिलासा मिळाला होता. मात्र बुधवारी एकाच दिवसात २६ नवे रुग्ण आढळून आल्याने मालेगाववासियांची चिंता वाढली असतांनाच गुरुवारी आणखी सहा रुग्ण आढळून आले. या रुग्णांमध्ये एका जिल्हा दैनिकात काम करणाऱ्या पत्रकाराचा समावेश आहे. या पत्रकारामध्ये करोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत. विशेष म्हणजे त्याचे दोन अहवाल प्राप्त झाले असून एक सकारात्मक व दुसरा अहवाल नकारात्मक आहे. एकाच व्यक्तीचे दोन परस्परविरोधी अहवाल आल्याने संभ्रम निर्माण झालेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या पत्रकाराचे विलगीकरण करण्यात आले आहे. नव्या रुग्णांमध्ये शहरात बंदोबस्तास असलेल्या सात पोलिसांचाही समावेश आहे. तसेच बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या शहरातील गणेश नगर मधील एकाच कुटुंबातील १० जणदेखील बाधित असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय दरेगाव,भायगाव,रावळगाव, हजारखोली, रमजान पुरा, आझाद नगर, आंबेडकर नगर, पंचशील नगर,अक्सा कॉलनी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.