लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या ६८ हजारांचा टप्पा ओलांडत असताना यातील सुमारे ५८ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८५.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात आठ हजार ४४० रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. जिल्ह्य़ात आतापर्यंत करोनाचे ६७ हजार ६५३ रुग्ण आढळले. नाशिक शहरात करोनाचा वेगाने फैलाव होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे ८८.९३ टक्के आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये ७८.८९ टक्के, मालेगाव शहरात ७९.७२, तर जिल्हाबाह्य़ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६८.७७ टक्के आहे. करोनामुळे आतापर्यंत एक हजार २२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक ग्रामीणमधील ३७९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६६९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५० आणि जिल्हाबाहेरील २७ रुग्णांचा समावेश आहे. सध्या सर्वाधिक म्हणजे साडेचार हजार रुग्ण नाशिक शहरात उपचार घेत आहेत.

ग्रामीण भागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या साडेतीन हजारच्या आसपास आहे. यात नाशिक तालुक्यात ४२५, चांदवड १३२, सिन्नर ५९०, दिंडोरी १५६, निफाड ८५१, देवळा ५५, नांदगांव २५१, येवला ६०, त्र्यंबकेश्वर ६७, सुरगाणा २५, पेठ २२, कळवण ६९, बागलाण १६०, इगतपुरी १४३, मालेगांव ग्रामीण ३३४ रुग्णांचा समावेश आहे. मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५६५, तर जिल्ह्य़ाबाहेरील १०२ रुग्ण स्थानिक पातळीवर उपचार घेत आहेत.

Story img Loader