सिडको अधिकाऱ्यांना कोंडले

नाशिक : शहरासाठी पाणीसाठा पुरेशा स्वरूपात उपलब्ध असला तरी काही ठिकाणी मात्र कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये सहा महिन्यांपासून अशा प्रकारे कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने सोमवारी नगरसेवकांसह परिसरातील महिलांनी महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. विभागीय अधिकारी न आल्याने पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना कोंडण्यात आले. मुख्य पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक २८ मध्ये सहा महिन्यांपासून विस्कळीत स्वरूपात पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांनी नगरसेविका सुवर्णा मटाले, दीपक दातीर यांच्या कार्यालयात वारंवार संपर्क साधत या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मटाले आणि दातीर यांनी सिडको विभागीय कार्यालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर काही दिवसांसाठी पाणीपुरवठा पुरेशा दाबाने झाला, परंतु विस्कळीतपणा कायम

राहिला. सध्या महिला वर्गाकडून उन्हाळी कामांना सुरुवात झालेली असताना त्यांना टंचाईला तोंड

द्यावे लागत आहे. दैनंदिन कामांनाच पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसताना उन्हाळी कामे करणार कोठून, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

या सर्व प्रकाराचा जाब विचारण्यासाठी सोमवारी परिसरातील रहिवासी सिडको विभागीय कार्यालयावर धडकले. सिडको विभागीय अधिकारी कांचन कुमावत यांनी चर्चा करून शंकांचे निरसन करावे, अशी मागणी त्यांनी केली. कुमावत या जमावाला सामोरे न जाता स्वतच्या दालनात बसून राहिल्या. याचा राग आल्याने जमावाने पाणीपुरवठा करणाऱ्या दौलत घुले, गोकुळ पगारे, ललित भावसार या तीन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना विभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात कोंडले. या सर्व घडामोडींबाबत पाणीपुरवठा अभियंता एस. बी. चव्हाण यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने सिडको विभागीय कार्यालय गाठत नागरिकांशी चर्चा केली. आठ दिवसांत नियमित स्वरूपात पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अघोषित ठिय्या आंदोलनाची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. एम. परोपकारी यांनी कर्मचाऱ्यांसह सिडको विभागीय कार्यालयाच्या आवारात धाव घेतली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी नगरसेविका मटाले यांच्यासह नगरसेवक दीपक दातीर उपस्थित होते.

प्रशासनाचा अजब कारभार

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात विस्कळीत पाणीपुरवठय़ाच्या निषेधार्थ अचानक आंदोलन सुरू झाल्याने कार्यालयाचे कामकाज रखडले. यावेळी नागरिकांनी अपुऱ्या पाणीपुरवठय़ासह प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. पाणीपुरवठा विभागाकडून दिली जाणारी पाणीपट्टी, प्रति माणसी मिळणारे पाणी यातील तफावतीकडे लक्ष वेधत प्रशासनाकडून वाढीव दरात पाण्याचे देयक आकारले जात असल्याची तक्रार काहींनी केली. सिडको परिसरातील असमान पाणी वाटपाबाबतही काहींनी नाराजी व्यक्त केली.

आंदोलन आचारसंहितेचा भंग करणारे

आचारसंहिता काळात कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा पक्षांनी पूर्वपरवानगी न घेता केलेले आंदोलन अथवा मोर्चा हा मतदारांना आकृष्ट करण्याच्या प्रकाराअंतर्गत आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. यासंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार असून त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल.

-डॉ. सुनीता कुमावत (विभागीय अधिकारी, नवीन नाशिक)