धुळे – शहरासह ग्रामीण भागातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत लाच मागितल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून नव्याने प्रक्रिया राबवावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. यासाठी उपायुक्तांना शिष्टमंडळाने तासभर घेराव घातला.
महिला बालकल्याण विभागाकडे अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी एक हजारापेक्षा अधिक अर्ज सादर झाले. या भरती प्रक्रियेत शैक्षणिक अर्हताप्राप्त उमेदवारांना शासनामार्फत परिपत्रकानुसार गुणांकन देण्यात आले होते, परंतु, स्थानिक महिला व बालकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी हे गुणांकन देतांना प्रचंड घोळ केला, या पदासाठी पात्र महिला उमेदवारांची आधी निवड करण्यात आली, शासनामार्फत याच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांवर भरती प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात आली, या कर्मचाऱ्यांनी उमेदवारांकडे लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा – नाशिक : दहशत माजविणारे २० गुन्हेगार तडीपार
यासंदर्भात असंख्य महिलांनी आपल्याकडे तक्रारी केल्याचा दावाही ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाने महिन्यापूर्वी या कार्यालयातील संबंधितांना जाब विचारला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे भरती प्रक्रियेवर स्थगिती आणावी, अशी मागणी केली. यासंदर्भात महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी विभागीय आयुक्त, महिला बालकल्याण विभाग यांच्याकडे लेखी तक्रार दिली. संबंधित भरती प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली, तक्रारीची दखल घेऊन नाशिकचे उपविभागीय आयुक्त धुळे येथे चौकशीसाठी आले असता अन्यायग्रस्त महिला उमेदवारांना सोबत घेऊन जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील, डाॅ. सुशील महाजन, भरत मोरे, महिला आघाडीच्या संघटक हेमाताई हेमाडे, डाॅ. जयश्री वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय आयुक्तांना तासभर घेराव घातला. उपविभागीय आयुक्तांनी अन्याय झालेल्या उमेदवारांनी आपले हरकतीचे अर्ज पुढील दोन दिवसांत कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले. या सर्व उमेदवारांची चार ते सहा जुलै रोजी प्रत्यक्ष सुनावणी धुळे येथील कार्यालयात घेण्याची घोषणा केली.
हेही वाचा – धुळ्याच्या अनेक भागात दुषित पाणी पुरवठा, ग्राहक फाउंडेशनची मनपाला नोटीस
यासंदर्भात ठाकरे गटाच्या वतीने ज्या महिलांनी अर्ज सादर केले आहेत, त्यांनी पुढील दोन दिवसांत हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.