नाशिक – कुरिअर देण्याच्या बहाण्याने आलेल्या संशयितांनी बांधकाम ठेकेदाराचा महागडा भ्रमणध्वनी हिसकावून नेला. त्या माध्यमातून ठेकेदाराच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून तब्बल साडेतीन कोटी रुपये लंपास केल्याचे उघड झाले आहे. याबाबत बांधकाम ठेकेदाराने तक्रार दिली आहे. तक्रारदार बुधवारी सकाळी गंगापूर रस्त्यावरील ओजस रेजन्सी या इमारतीतील आपल्या कार्यालयात असताना एक व्यक्ती आली.
ब्ल्यू डर्ट कुरिअरकडून आल्याचे सांगून कुरिअर देण्याच्या बहाण्याने त्या युवकाने ठेकेदाराच्या हातातील महागडा भ्रमणध्वनी हिसकावून कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराबरोबर पलायन केले. यानंतर संशयितांनी ठेकेदाराच्या कंपनीच्या नावे असलेल्या दोन बँक खात्यातून रोकड लंपास केली. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून संशयितांनी तीन व्यवहाराद्वारे तब्बल तीन कोटी ५३ लाख ५५ हजार ३७३ रुपयांची रक्कम परस्पर अन्य बँक खात्यात वर्ग केली. या प्रकरणी कुरिअर कंपनीचा कर्मचारी, दुचाकीवर थांबलेला व्यक्ती आणि बँक खाते उपलब्ध करून देणारे खातेधारक यांच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेकेदारासह बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा
पुणे विद्यार्थी वसतिगृहाच्या बांधकाम प्रकल्पात तिसऱ्या मजल्यावरून पडून परप्रांतीय कामगाराच्या मृत्यू प्रकरणी अखेर ठेकेदारासह दोघा बांधकाम व्यावसायिकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ललिता बरड यांनी तक्रार दिली. ठेकेदार खलील अशरफ मोहम्मद, बांधकाम व्यावसायिक मनोज थोरात आणि विशाल पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या घटनेत कनसिंह बारेला उर्फ कनसिंग बरडे (मूळ रा. मध्य प्रदेश, हल्ली काळाराम मंदिराच्या बाजूला, नाशिक) या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. कनसिंह पुणे विद्यार्थी गृहाच्या बांधकाम प्रकल्पावर कामास होता. नऊ डिसेंबर रोजी सकाळी तो तिसऱ्या मजल्यावर बांधकामास पाणी मारत असताना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला.
या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यास आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. महिनाभराच्या उपचारानंतरही त्याच्या प्रकृर्तीत सुधारणा न झाल्याने त्यास इंदूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर भामट्यांकडून गंडा
व्यावसायिक कर्ज मुदतपूर्व भरून देण्यास सहकार्य करीत असल्याच्या भूलथापा देत सायबर भामट्यांनी एकास तब्बल साडे नऊ लाखास गंडा घातला. याबाबत प्रसाद आवेकर (अशोकनगर, सातपूर ) यांनी तक्रार दिली. आवेकर यांनी आदित्य बिर्ला कॅपिटल या संस्थेकडून व्यावसायिक कर्ज घेतले आहे. १३ फेब्रुवारी रोजी त्यांच्याशी संशयितांनी संपर्क साधला होता.
आदित्य बिर्ला कॅपिटलमधून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी कर्जाबाबत अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी आवेकर यांनी व्यावसायिक कर्जाची मुदतपूर्व परतफेड करायचे असल्याचे सांगितल्याने ही फसवणूक झाली. संशयितांनी आवेकर यांना कर्ज मुदतपूर्व बंद करण्यासाठी बंधन बँकेच्या एका खात्यात आठ लाख ५७ हजार १९ तर सेंट्रल बँकेच्या अन्य खात्यात ८९ हजार २१० रुपये भरण्यास भाग पाडले. आवेकर यांची सुमारे नऊ लाख ४६ हजार २२९ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.