बांधकाम प्रकल्पात दोन गाळ्यांसाठी नोंदणीकरिता एक कोटी २० लाख रुपयांची रक्कम स्वीकारून हे काम पूर्ण न करता आणि ग्राहकास रक्कम परत न करता फसवणूक केल्या प्रकरणी कारडा कन्स्ट्रक्शनचे प्रमुख नरेश कारडा यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी न्यायालयाने तीन नोव्हेंबरपर्यंत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली. या प्रकरणात कारवाई उघड झाल्यानंतर कारडा कन्स्ट्रक्शन विरोधात स्थानिक तसेच राज्यातील ग्राहकांकडून तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. नोंदणीचे पैसे घेऊनही अनेकांना मालमत्तेचा ताबा दिला गेला नसल्याचे समोर येत आहे. या घटनाक्रमाने फसवणुकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता तपास यंत्रणेने व्यक्त केला.
हेही वाचा >>> नंदुरबारचे तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
या संदर्भात राहुल लोनावत यांनी तक्रार दिल्यानंतर कारडा कस्ट्रक्शनचे प्रमुख नरेश कारडा, व्यवस्थापकीय संचालक मनोहर कारडा, देवेश कारडा आणि संदीप शहा यांच्या विरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. लोनावत यांनी कारडा यांच्या अशोका मार्गावरील प्रस्तावित बांधकाम प्रकल्पात दोन गाळ्यांसाठी नोंदणी केली होती. त्यासाठी एक कोटी २० लाख रुपये दिले होते. डिसेंबर २०१९ पासून रक्कम स्विकारूनही संशयितांनी बांधकाम पूर्ण केले नाही. पैश्यांची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली. शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नरेश कारडा यांना अटक केली.
हेही वाचा >>> नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास
२००७ मध्ये स्थापन झालेली कारडा कन्स्ट्रक्शन शहर परिसरात १५ हून अधिक प्रकल्प पूर्ण केल्यानंतर २०१८ मध्ये शेअर बाजारात सुचिबध्द झाली होती. त्यामुळे कंपनीचा पसारा वाढल्याची चर्चा होत असताना उपरोक्त गुन्हा दाखल झाल्यामुळे कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या कारवाईने फसवणूक झालेले ग्राहक पुढे येत आहेत. विविध प्रकल्पात सदनिका किंवा गाळ्यांच्या नोंदणीसाठी कारडा कन्स्ट्रक्शनने पैसे घेतले. परंतु, संबंधितांना मालमत्तेचा ताबा दिला नसल्याचे सांगितले जाते. कारडा यांना अटक झाल्याचे समजताच अशा अनेक ग्राहकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी देण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात १२ हून अधिक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. केवळ नाशिकच नव्हे तर, अन्य शहरातील नागरिकांनी कारडा कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केली होती. त्यांना नोंदणी केलेली मालमत्ता व पैसे मिळाले नसल्याचे सांगितले जाते. संबंधितांनी नाशिक पोलिसांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आपली व्यथा मांडली. तक्रारीची संख्या वाढत असून फसवणुकीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.