भव्यदिव्य देखावे, मूर्ती, भगवेमय वातावरण आणि आकर्षक सजावटीच्या माध्यमातून रविवारी नाशिक शहर व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी नाशिक शहर आणि नाशिकरोड परिसरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी शिवजयंती अधिकाधिक उत्साहात साजरी करण्यावर लक्ष केंद्रित केले. या सोहळ्यावर शिवसेनेतील वादाचे सावट दिसून आले. मुख्य मिरवणुकीत काही प्रमुख राजकीय नेत्यांची मंडळे सहभागी झाली नाहीत. देवळा येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. अनेक शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत आसपासच्या गडकिल्ल्यांवर शिवजयंती साजरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नाशिक : दुचाकी झाडावर आदळून दोन जणांचा मृत्यू

शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते रविवारी भगवेमय झाले. कार्यकर्त्यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर भगवे झेंडे फडकावले. या दिवशी सार्वजनिक मंडळांना मंडळांच्या जागेवरच डिजिटल ध्वनियंत्रणेच्या वापरास परवानगी मिळाल्याने अनेक ठिकाणी त्यांचा वापर झाला. सकाळपासून शिवाजी महाराजांवरील पोवाडय़ांनी वातावरणाचा नूर पालटला. राजकीय पक्षांबरोबर इतर संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. या उत्सवावर बदलती राजकीय परिस्थिती आणि महापालिका निवडणुकीचे प्रतिबिंब उमटले. जवळपास सर्वच प्रभागात इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन केले. पालकमंत्री दादा भुसे आणि माजीमंत्री छगन भुजबळ यांनी विविध मंडळांना आवर्जुन भेटी दिल्या.

हेही वाचा- नाशिक : शालेय परिसरात टवाळखोराची विद्यार्थिनीला धमकी; गुन्हा दाखल

अशोकस्तंभ परिसरात उभारण्यात आलेल्या ६१ फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधले, छत्रपती सेनेच्यावतीने २१ फूट कवड्यांची माळ साकारण्यात आली. नवीन सिडकोतील पवननगर मैदानावर भव्य किल्ला उभारण्यात आला. हिरावाडी फ्रेंड्स सर्कलने शिवाजी महाराजांच्या आरमाराचा देखावा सादर केला. तो शिवजयंतीनंतरही काही दिवस पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळाल्याने मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ढोल पथकांनी अनेक मंडळांच्या ठिकाणी ढोल वादन केले.

हेही वाचा- “आमदार-खासदारांच्या बळावर थेट पक्षावर दावा होत असेल, तर छोट्या पक्षांचं कसं होणार?”, संभाजीराजे छत्रपती म्हणाले…

जुने नाशिक भागातील मंडळांनी सकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन केले. दुपारी चार वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत वाकडी बारव येथून शहरातील मुख्य मिरवणुकीला सुरूवात झाली. याप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाजपचे महानगरप्रमुख गिरीश पालवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरूवात झाली. मुख्य मिरवणुकीत छत्रपती सेना, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, जाणता राजा मित्र मंडळ आणि युवा संघर्ष प्रतिष्ठान ही चार मंडळे सहभागी झाली. माजी महापौर विनायक पांडे यांचे शिवसेवा आणि वसंत गिते यांचे मुंबई नाकासह अन्य काही मोठी मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली नाहीत. शिवसेनेतील वादाचे सावट मिरवणुकीवर दिसले. नाशिकरोड येथे शिवजयंतीचा अभुतपूर्व उत्साह होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज होती. वाकडी बारव ते रामकुंड (पंचवटी) मार्गावरील वाहतूक मिरवणूक काळात बंद ठेवण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवण्यात आले. मनपा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्यांनी आपापल्या प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा- मायलेकीवर हल्ला करुन संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

मनसे महिला पदाधिकाऱ्याच्या सुरक्षा रक्षकांकडे एअर गन

मुख्य मिरवणुकीत मनसेप्रणीत मंडळही सहभागी झाले होते. यावेळी मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वागता उपासणी यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडे एअरगन असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षकांकडील एअर गन ताब्यात घेऊन त्यांना चौकशीसाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात नेले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Creation of magnificent scenes on the occasion of shiv jayanti in nashik district dpj