नाशिक – रविवारी चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील अंतिम सामना भारताने जिंकल्यानंतर शहरात ठिकठिकाणी क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावर उतरुन जल्लोष केला. कॉलेजरोड परिसरात विजयानंतर फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे महाविद्यालय परिसरात आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन जात असताना काॅलेजरोडवर क्रिकेटप्रेमींच्या गर्दीमुळे वाहनाला पुढे जाता येईना. यावेळी काही हुल्लडबाजांनी वाहनावर चढून धिंगाणा घातला. विशेष म्हणजे, इतके होऊनही ना अग्निशमन विभागाने हा प्रकार गंभीरतेने घेतला ना पोलिसांनी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर शहरात क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले. लोक आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले. घराबाहेर पडत फटाक्यांची आतषबाजी केली. उडत्या चालीवरील गाण्यांवर काहींनी रस्त्यातच ठेका धरला. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. कॉलेज रोड परिसरातील चौकात तर गर्दीमुळे चालणेही मुश्कील झाले होते. गाण्याच्या ठेक्यावर तरूणाई नाचत असतांना काहींनी आतषबाजीला सुरुवात केली. भि.य.क्ष. महाविद्यालयालगत असलेल्या मोकळ्या मैदानात काही जळते फटाके पडले. वाळलेल्या गवताने त्यामुळे पेट घेतला. हा प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात येताचयी अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळाकडे निघाला असतांना त्यास काॅलेज रोडवरील गर्दीमुळे पुढे जाता येईना. गर्दीतील काही हुल्लडबाजांनी अग्निशमन वाहनावर चढून नाचण्यास सुरुवात केली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हुल्लडबाजांना वाहनावरुन उतरवितांना नाकीनऊ आले. यावेळी उपस्थित पोलीस या गोंधळात केवळ बघ्याच्या भूमिकेत राहिले. अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी हुल्लडबाजांना वाहनावरुन उतरविल्यानंतर वाहन घटनास्थळी दाखल झाले. वाहनास उशीर झाल्याने आग अधिक पसरली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. मैदानातील गवतासह परिसरातील झाडांना आगीची झळ बसली. विशेष म्हणजे, काॅलेजरोडवर अग्निशमनच्या वाहनाबद्दल इतका धांगडधिंगा होऊनही अग्निशमन तसेच पोलीस यांच्याकडून हुल्लडबाजांविरूध्द कुठलीही कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कॉलेजरोड परिसरात अग्निशमन बंब हा जागेवर उभा होता. काहींनी हुल्लडबाजी केली. परंतु, अग्निशमन विभागाकडून याविषयी कुठलीही तक्रार न आल्याने कारवाईचा प्रश्नच येत नाही.- जगविंदरसिंह राजपूत (निरीक्षक, गंगापूर रोड पोलीस ठाणे)

रविवारी भारत विजयी झाल्यानंतर कॉलेजरोड परिसरात तरूणांनी मोठ्या प्रमाणावर आतषबाजी केली. तेथील मोकळ्या मैदानात आग लागल्याने अग्निशमन बंब जात असताना तरूण बंबावर चढले. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. त्याठिकाणी पोलिसांची संख्या कमी होती.- के. पी. पाटील (अग्निशमन अधिकारी)