लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या वतीने समाजमाध्यमात चित्रफित दाखविण्याची धमकी देत तक्रार मिटविण्यासाठी अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पक्षाचे प्रमुख जितेंद्र भावे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत युसुफ पठाण यांनी तक्रार दिली. पठाण हे चेतनानगर येथील महावीर व्हिल्स या ठिकाणी काम करतात. संशयित दिगंबर पाठे यांचे अपघातग्रस्त वाहन दुरुस्तीसाठी दालनात लावले असताना सुटे भाग बदलल्याचा आक्षेप घेत पाठे आणि निर्भय महाराष्ट्र पक्षाचे जितेंद्र भावे, राजेंद्र गायधनी आणि इतर सात ते आठ कार्यकर्ते दालनात शिरले. भ्रमणध्वनीत चित्रण करून ते समाजमाध्यमात थेट प्रक्षेपित केले. तुम्ही आम्हाला अडीच लाख रुपये दिल्यास तक्रार मिटवली जाईल. अन्यथा पुन्हा अशाच प्रकारे काहीतरी तक्रारी घेऊन येत समाज माध्यमात चित्रफिती प्रसारित केल्या जातील, अशी धमकी दिल्याचे पठाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनसाखळी चोरींमध्ये वाढ

शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र कायम असून गंगापूर रोड आणि कॉलेज रोड भागात पुन्हा दोन घटना घडल्या. पहिली घटना पाईपलाईन मार्गावरील काळेनगर भागात घडली. याबाबत पवनकुमार कुमावत (रा. विवेकानंदनगर) यांनी तक्रार दिली. कुमावत गुरूवारी रात्री मुलीस घेऊन घराजवळ आईस्क्रीम घेण्यासाठी गेले होते. मधूर स्वीट दुकानातून आईस्क्रीम घेऊन ते घराकडे परतत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी कुमावत यांच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून संत कबीरनगरच्या दिशेने पलायन केले.

दुसरी घटना कृषीनगर भागात घडली. याबाबत शितल जाधव (रा.कृषीनगर) यांनी तक्रार दिली. जाधव या रात्री पती आणि मुलांसह जाँगिंक ट्रॅॅकवर गेल्या होत्या. फेरफटका मारून जाधव कुटूंबिय घराकडे पायी येत असताना प्रधान पार्क इमारतीसमोर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख सात हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या दोन्ही घटनांप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. सिडकोतील विक्की वाकळे (२८) हा युवक गुरूवारी रात्री नाशिक-पुणे महामार्गावरून दुचाकीने नाशिकरोडच्या दिशेने जात असतांना टोल नाक्याजवळ दुचाकीचा अपघात झाला. गंभीर जखमी झाल्याने त्यास रुग्णवाहिका चालक संतोष झाडे यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याचा तत्पूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुसरा अपघात आयनॉक्स सिग्नल भागात झाला. धर्मेद्र चौधरी (५८, शिवाजीनगर) हे शुक्रवारी दुचाकीने प्रवास करीत होते. पंचशिलनगर येथून मुंबई नाक्याकडे जात असताना आयनॉक्स सिग्नल भागात मागून आलेल्या मालमोटारीचा धक्का बसला. या अपघातात चौधरी हे दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले. मित्र निखिलसिंगने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. डॉ. निखील बोरा यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.