लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक – सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शिंदे-भाजप सरकार बेकायदेशीर ठरविले असून या सरकारचे बेकायदा आदेश विधानसभा अध्यक्ष, प्रशासन आणि पोलिसांनी पाळू नये. अन्यथा तुम्हीच अडचणीत याल, असा इशारा देणारे ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविषयी शुक्रवारी खासदार राऊत यांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. न्यायालयाने शिंदे गट आणि सरकारचे पूर्णत: वस्त्रहरण करून आमदारांच्या अपात्रतेचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला आहे. शिंदे गटाने नेमलेले प्रतोद बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर प्रतोदांचे आदेश बेकायदेशीर असून न्यायालयाने ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचा व्हिप कायदेशीर असल्याचा निर्वाळा दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

आणखी वाचा-“येत्या तीन महिन्यांत संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार”, नितेश राणेंचा मोठा दावा; ‘या’ गुन्ह्याखाली होणार अटक?

निकालात राज्यपालांचे सर्व निर्णय बेकायदेशीर ठरले. एकनाथ शिंदे यांची निवड बेकायदेशीर ठरली. न्यायालयाने हे सरकारच अपात्र, बेकायदेशीर ठरविले असल्याने प्रशासन व पोलिसांनी त्यांचे बेकायदा आदेश पाळू नये, असे आवाहन राऊत यांनी केले होते. ही विधाने त्यांना महागात पडली आहेत. राऊत यांच्या वक्तव्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याची तक्रार कर्मचाऱ्याने तक्रार दिल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी राऊत यांच्या विरोधात पोलीस अप्रियता अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमांद्वारे मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीनंतर पोलीस दलाने अधिक माहिती देण्यासंदर्भात मौन बाळगले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against sanjay raut because of not to follow orders appeal mrj
Show comments