पोटभरु प्रवृत्तीला चपराक
‘सुजाण पालकत्व’चे धडे विविध माध्यमांतून गिरवले तरी पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या पाल्यांचा ढाल म्हणून वापर करणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच पोटभरू प्रवृत्तीच्या पालकांना धडा शिकविण्यासाठी बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बालकांना भीक मागण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चार पालकांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे संबंधित बालकांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे.
बालहक्कांवर काम करणाऱ्या संघटनांनी काही महिन्यांपासून शहरात सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. बाल भिकारी हे बाल मजुरासारखे असून त्यांना सर्वसामान्य बालकांप्रमाणे किमान प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे यावर या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. त्याकरिता शासकीय यंत्रणांची मदत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी संस्थांमार्फत अशा पालकांच्या वस्तीवर किंवा नाक्यांवर जाऊन मार्गदर्शन करण्यात येते. काही पालकांनी स्वखुशीने आपल्या मुलांचे भवितव्य चांगले होईल या विचाराने पाल्यांना संस्थेच्या हवाली करत त्यांच्या पालकत्वाची अप्रत्यक्ष जबाबदारी सोपविली. मात्र अद्याप काही पालक १२ वर्षांखालील बालकांचा वापर रस्त्यावर, सिग्नल वा गर्दीच्या ठिकाणी भीक मागण्यासाठी करत असल्याचे निदर्शनास आले. अशा पालकांना धडा शिकविण्यासाठी कायदेशीर मार्ग अनुसरण्यात आला आहे.
बुधवारी अशा स्वरूपातील पहिलाच गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला. सामाजिक संस्थेचे समन्वयक योगीराज जाधव यांनी या संदर्भात तक्रार दिली. सीबीएस व गडकरी चौक येथील सिग्नल परिसरात एक ते ११ वर्षे वयोगटातील १३ बालके रस्त्याने भीक मागत होती. पालकांचे प्रबोधन करूनही त्यांनी त्यास जुमानले नाही. संबंधित बालकांना भीक मागण्याच्या कामात जुंपवून ठेवले. या प्रकरणी अलका शिवा पवार, संगीता दशरथ काळे, संगीता राजू काळे आणि सुनीता नारायण यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पालकांना ताब्यात घेतल्यावर पोलिसी खाक्यात समज देण्यात आली, तसेच बालकांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. या बालकांना चांगल्या सुविधा कशा देता येतील, त्यांना अधिक काळ वेगळे ठेवून पालकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न सामाजिक संस्था व पोलीस करणार आहेत.

Story img Loader