नाशिक : शहरातील उंटवाडी येथे सराईत गुन्हेगाराची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेतले.
शहरात मंगळवारी रात्री सर्वजण नववर्ष स्वागताची तयारी करत असताना उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीमागील मोकळ्या मैदानात तीन जणांनी मद्य प्राशन करण्याचा बेत आखला. लक्ष्मण गारे हा घरी असताना रात्री १० वाजेच्या सुमारास संशयित गणेश भावसार आणि रिझवान काजी (दोघे रा. क्रांतीनगर) हे लक्ष्मण यास घरातून दुचाकीने घेऊन आले. ‘थर्टी फर्स्ट’ ची पार्टी करू असे सांगून त्याला उंटवाडी रोडवरील मोकळ्या मैदानात घेऊन गेले. तेथे जुन्या भांडणाची कुरापत काढून लक्ष्मणबरोबर वाद घातला. एकमेकांना शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात दोघांनी दगड टाकला. लक्ष्मण हा रक्ताच्या थारोळ्यात पडताच दोघे हल्लेखोर दुचाकीने घटनास्थळावरून निघून गेले.
हेही वाचा…मयताचे शीर घेऊन मारेकरी पोलीस ठाण्यात हजर
या प्रकाची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकांनी संशयितांचा शोध सुरु केला. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. रुग्णालयाच्या आवारात रात्री मयत युवकाचे नातेवाईक, मित्र परिवाराने गर्दी केली होती. भावसार आणि काजी हे दोघेही पोलिसांच्या यादीतील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही मारहाण व दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा…शहरातून ७४ नायलाॅन मांजा विक्रेते हद्दपार, पोलीस आयुक्तांची कारवाई
पोलिसांना शुभम मिरके आणि त्याचे साथीदार हे पेठरोड येथील फुलेनगर परिसरात येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत शुभम मिरके (२१), अरूण वळवी (२१), रिझवान काझी (२९) सर्व रा. क्रांतीनगर यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचा साथीदार गणेश भावसार याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.