लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: मे महिन्याच्या मध्यावर तापमानाने ४० अंशाचा टप्पा गाठला असताना दुसरीकडे पाणी टंचाईचे संकट विस्तारत आहे. मेच्या मध्यावर जिल्ह्यातील धरणसाठा ३६ टक्क्यांवर आला आहे. सध्या ४१ गावे व १९ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. १५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसात टंचाईच्या गर्तेत सापडणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. अल निनोच्या प्रभावाने पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन केले जात आहे. पुढील महिन्यात पुन्हा जलसाठ्याचा आढावा घेऊन शहरातील कपातीबाबत पुर्नविचार केला जाणार आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात प्रारंभी अवकाळी पाऊस, गारपीट व ढगाळ हवामानामुळे उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नव्हती. मात्र मे महिना त्यास अपवाद ठरला. याच काळात जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदले गेले. पारा ४० अंशाच्या पुढे गेला असताना ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. पाणी टंचाईची सर्वाधिक झळ येवला तालुक्यास बसत आहेत. या तालुक्यातील २५ गावे व नऊ वाड्यांना १८ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात सात गावे व आठ वाडीला तीन वाडीला आठ टँकरने पाणी पुरविले जात आहे. बागलाण तालुक्यात तीन गावे, एक वाडी (दोन टँकर), चांदवडमध्ये पाच गावे, एक वाडी (तीन टँकर), देवळा एक गाव (एक) अशी स्थिती आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने एकूण १५ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. यात बागलाणमध्ये एक, देवळा तालुक्यात तीन, मालेगावमध्ये ११ विहिरींचा समावेश आहे. सध्या सुमारे जवळपास ६९ हजार लोकसंख्येच्या गावांना ३२ टँकरद्वारे पाणी दिले जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यामध्ये १० शासकीय व २२ खासगी टँकरचा अंतर्भाव आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास टंचाईच्या संकटात सापडणाऱ्या गावांची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मध्यंतरी शहरी भागात पाणी बचतीसाठी कपातीचा विचार झाला होता. तथापि, जलसाठ्याची स्थिती तुर्तास समाधानकारक असल्याने त्या संदर्भातील निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. जूनमध्ये पुन्हा आढावा घेऊन गरज भासल्यास कपातीबाबत विचार केला जाणार आहे.
आणखी वाचा-महाकवी कालिदास कलामंदिराला असुविधांचे ग्रहण
आठ धरणांमध्ये २० टक्क्यांहून कमी जलसाठा
जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये सध्या २३ हजार ३९८ दशलक्ष घनफूट अर्थात ३६ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी धरणांमध्ये ३५ टक्के पाणी होते. या वर्षी पाऊस उशिराने दाखल होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ऑगस्टअखेरपर्यंत धरणातील पाणी पुरेल असे फेरनियोजन केले जात आहे. एरवी धरणांतील पाण्याचे ३१ जुलैपर्यंत पुरेल या हिशेबाने नियोजन केले जाते. माणिकपूंज हे धरण कोरडेठाक झाले असून नागासाक्या, गौतमी गोदावरी, काश्यपी, तिसगाव, भोजापूर, वाघाड, पुणेगाव, आळंदी या आठ धरणांतील जलसाठा चार ते २० टक्क्यांच्या दरम्यान आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या २६६८ दशलक्ष घनफूट (४७ टक्के) जलसाठा आहे. याच समुहातील काश्यपीत ३७९ (२०), गौतमी गोदावरी २२७ (१२), आळंदी ११५ (१४) पाणी आहे. पालखेड १३९ (२१), करंजवण १४७९ (२८), वाघाड १८२ (८), ओझरखेड ५९१ (२८), पुणेगाव ११० (१८), तिसगाव ५० (११), दारणा ४२८५ (६०), भावली ३०० (२१), मुकणे ३८५८ (५३), वालदेवी २९४ (२६), कडवा ४४४ (२६), नांदूरमध्यमेश्वर २५३ (९८), भोजापूर ७२ (२०), चणकापूर ९९१ (४१), हरणबारी ५९८ (५१), केळझर २१४ (३७), नागासाक्या १७(४), गिरणा ५१२१ (२८), पुनद १०११ (७७) असा जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.