लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: रावेरसह तालुक्याला बुधवारी दुपारी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी पावसाने जोर धरला. रावेर शहरासह तालुक्यातील घरांसह दुकानांमध्ये पाणीच पाणी झाले होते. नागझिरी नदीच्या पुरात मोटार वाहून गेली. मात्र, मोटारीतून उड्या मारल्याने चौघे बचावले. तालुक्यात केळीसह इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. विवरा गाव पुराच्या वेढ्यात आहे.

रावेरसह तालुक्यात पाच जुलैला अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्यावेळी तिघांचा मृत्यू झाला होता. तसेच केळीचेही मोठे नुकसान झाले होते. त्याच्या कटू आठवणी ताज्या असताना, चौदा दिवसांनंतर बुधवारी पुन्हा रावेर शहरासह तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला.

आणखी वाचा-नाशिक: सप्तश्रृंग गडाच्या दरीतून अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात यश

पहाटेपासूनच रावेरसह तालुक्यात रिपरिप सुरू होती. दुपारी पावसाचा जोर वाढला. यामुळे शहरासह तालुक्यातील विविध गावे जलमय झाली. रावेर शहरातील नागझिरी नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. तेथून वाहतूक बंद करण्यात आली असून, पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. शहरातील 40 ते 45 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. आदित्य इंग्लिश स्कूलसह इतर शाळांच्या प्रांगणात तलाव साचले आहेत. रस्त्यांची तर दैनाच झाली आहे. रस्त्यांवरही तलाव साचले आहेत. गटारही तुडुंब भरून वाहत आहेत. जुन्या सावदा रस्त्यावरील नागझिरी नदीचा कठडा तुटला आहे. तो सध्या धोकादायक ठरत आहे.

तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला आहे. कुंभारखेडा-खिरोदा, रावेर-अजंदे, रावेर-रमजीपूर, रावेर-कुंभारखेडा, शिंदखेडा-रावेर, खिरवड-पातोंडी या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला असून, तालुक्यातील विवरा, अजंदे, खिरोदा, सावदा, पातोंडी, निंभोरा व अन्य गावांमध्येही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतशिवारालाही मोठा फटका बसला आहे. शेतांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. शेतबांधही फुटले आहेत. वीजवाहिन्याही तुटल्यामुळे पुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. पावसामुळे सुकी नदीला मोठा पूर आला आहे. या पुराने दाणादाण झाली असून, विवरे गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

आणखी वाचा-भुसावळ: हतनूरच्या ४१ दरवाजांमधून विसर्ग

पुनगाव येथील पुलाचा भराव वाहून गेला. तालुक्यातील आभोडा, गारबर्डी धरण पूर्णक्षमतेने १०० टक्के भरून ओसंडून वाहत आहे.सुकी नदीच्या पुराने उंटखेडा, कुंभारखेडा, पाल आणि खिरोदा या रस्त्यांवरील वाहतूक थांबली आहे. निंभोरा परिसरातील केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने तालुक्यातील केळी उत्पादकांसह शेतकर्‍यांना तातडीने मदत करून दिलासा देण्याची मागणी होत आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तालुक्यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crop damage due to torrential rains in raver taluka mrj
Show comments