शहरात अनेक ठिकाणी गर्दी; पुढील काही दिवसांत परिणाम कळण्याची भीती
नाशिक : विविध पातळीवर प्रयत्न करूनही गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. लहान मुलांना घेऊन अनेक कुटुंबे विसर्जनस्थळी आली होती. काहींना मुखपट्टीचाही विसर पडला. ध्वनिक्षेपकावरून आवाहन करूनही काही ठिकाणी गर्दी नियंत्रित झाली नाही. या सर्वाची परिणती करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यात होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. पुढील काही दिवसात त्याचे परिणाम कळतील, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
करोनाच्या सावटात गणेशोत्सव शांततेत साजरा झाला. लाडक्या गणरायाला निरोप देताना गणेशभक्तांची गर्दी रोखण्याचे आव्हान यंत्रणांसमोर होते. विसर्जन मिरवणुकीला बंदी असल्याने ती गर्दी आपोआप रोखली गेली. मात्र, काही विसर्जन स्थळांवर भक्तांची उसळलेली गर्दी चिंता वाढविणारी ठरली. विसर्जनाच्या दिवशी गर्दी होऊ नये म्हणून पोलीस, महापालिकेने अनेक प्रयत्न केले.
यंदा प्रथमच विसर्जनासाठीची वेळ ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था केली गेली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय पीओपी गणेशमूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करता यावे म्हणून अमोनियम बायकाबरेनेटचे मोफत वितरण करण्यात आले. शाडू मातीच्या मूर्तीना अनेकांनी पसंती दिली होती. त्यांना घरातच मूर्ती विसर्जित करणे शक्य झाले. या माध्यमातून दोन, तीन लाख नागरिकांना गर्दीपासून दूर ठेवण्यात यश मिळाल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले.
महापालिकेने प्रभागवार नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांची उपलब्धता केली होती. विसर्जनस्थळाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद करून वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला. ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे गणेशभक्तांना सूचना दिल्या जात होत्या. रोटरी क्लब, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मूर्ती संकलन उपक्रमात सुरक्षित अंतराचे पथ्य पाळले जाईल याची काळजी घेत होते.
विसर्जनस्थळी नियमावलीचे पालन करणारे आणि न करणारेदेखील होते. अनेक कुटुंबे बालगोपाळांना घेऊन दाखल झाली होती. गर्दीत मुखपट्टी परिधान न करणारे, सुरक्षित अंतराचे पथ्य पालन न करणारे काही जण होते. गौरी पटांगण, तपोवन, रामकुंड अशा अनेक ठिकाणी गर्दी झाली होती. गौरी पटांगण येथे पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही गर्दी कमी होत नव्हती.
गंगापूर रस्त्यावरील शहीद अरुण चित्ते पुलावर पोलिसांच्या सूचनांचे पालन केले जात असल्याचे दिसले. मात्र काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले. ही गर्दी करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारक ठरणार असल्याची शक्यता वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात ६२६ करोनाबाधित रुग्ण आढळले होते. करोनाचा आलेख उंचावत असताना विसर्जनावेळच्या गर्दीचे परिणाम पुढील काही दिवसांत निदर्शनास येतील, असे सांगितले जात आहे.
करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर लक्षणे दिसण्याचा कालावधी एक ते १४ दिवसांपर्यंत असतो. केवळ गणेशोत्सव नव्हे, तर बाजारपेठांमध्येदेखील गर्दी होत आहे. सुरक्षित अंतराचे पथ्य, मुखपट्टी आदी नियम वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून पाळायला हवेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
– बापूसाहेब नागरगोजे, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका