नाशिक – काठे गल्ली भागातील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम काढण्यासाठी महानगरपालिका आणि पोलिसांनी तयारी सुरू केल्यानंतर बुधवारी रात्री परिसरात जमावाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. १५ ते २० जणांना ताब्यात घेण्यात आले. या घटनाक्रमामुळे परिसरात तणावाची स्थिती असून मोठ्या पोलीस बंदोबस्तात सकाळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली.
काठे गल्ली सिग्नल परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने काठे गल्ली सिग्नल ते वडाळा रस्त्यावरील नागजी सिग्नल चौकापर्यंतच्या मार्गावरील वाहतूक बुधवारी रात्रीपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. वाहतूक बंद केली जात असताना रात्री जमावाने विरोध करीत दगडफेक केली. यात पाच ते सात वाहनांचे नुकसान झाले.जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
काठे गल्ली सिग्नलकडून नागजी चौक, मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर हे धार्मिक स्थळ आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेने धार्मिक स्थळासभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. तेव्हा संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले नाही, अशी तक्रार करीत उर्वरित अतिक्रमणही हटविण्याचा आग्रह भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी धरला होता.
मुदत संपल्यानंतर कारवाई
महानगरपालिकेने हे धार्मिक स्थळ अनधिकृत प्रार्थनास्थळांच्या यादीत असल्याचे नमूद करीत नोटीस बजावली होती.१५ दिवसांत स्वताहून ते काढून घ्यावे अन्यथा नंतर कोणत्याही क्षणी ते हटविले जाईल असे सूचित करण्यात आले होते. १५ दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिकेने या धार्मिक स्थळावर कारवाईला सुरूवात केली.
दगडफेकीत २१ पोलीस जखमी, तीन वाहनांचे नुकसान
धार्मिक स्थळाचे बांधकाम हटविण्यास विरोध करण्यासाठी जमाव हिंसक बनला. जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर व मुस्लीम नेत्यांवर दगडफेक केली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दगडफेकीत तीन पोलीस वाहनांचे नुकसान झाले. तर २१ पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई प्रगतीपथावर आहे. पोलिसांनी संशयितांचे अटकसत्र सुरू केले आहे.