नाशिक: पिंडाला काकस्पर्श होण्यासाठी आतुरतेने कावळय़ाची वाट पाहणाऱ्या मानवाच्या घातक सवयी आता कावळाही उचलू लागला आहे. रस्त्याने जाताना कुठेही सिगारेटचे थोटूक, रिकामे पाकीट, पानमसाल्याची पाकिटे टाकून देण्याची मानवाची सवय आता कावळय़ांसाठी त्रासदायक ठरु लागली आहे. अशी पाकिटे उचलून ती पाण्यात बुडवित कावळे खाऊ लागले असल्याचे धक्कादायक निरीक्षण ‘नेचर क्लब ऑफ नाशिक’च्या पक्षी अभ्यासकांनी नोंदविले आहे. या सवयीमुळे कावळय़ांना विविध आजार होऊन त्यांचा मृ़त्यू ओढावण्याची शक्यता आहे.
प्रत्येक प्राणी आणि पक्ष्याचे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्वत:चे महत्त्व आहे. त्यांचे अस्तित्व कायम राहणे, हे आपल्यासाठीही हितकारक आहे, हेच मानव शहरातील सिमेंटच्या जंगलात विसरत चालला आहे. शहरात डोम कावळा आणि गाव कावळा असे कावळय़ाचे दोन प्रकार बघावयास मिळतात. मनुष्य वस्तीच्या जवळ हमखास आढळणारा हा पक्षी असून कोकिळेच्या पिलाला वाढविण्याचे कामदेखील कावळा करीत असतो. आता गावांचे रुपांतर शहरात होत आहे. शहराजवळील शेती गायब होऊन मोठे गृह प्रकल्प उभे राहत आहेत. या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पक्षीदेखील स्वत:मध्ये बदल घडवू पाहत असल्याचे चित्र शहरात बघावयास मिळते.
हेही वाचा >>> मराठा समाजातर्फे मालेगावात रास्ता रोको
कावळे घरटे बनविताना काडय़ांबरोबर आता लोखंडी तारा वापरु लागले आहेत. आता तर कावळय़ांच्या खाद्य संस्कृतीतही बदल बघावयास मिळत आहे. अनेक महिन्यांपासून कावळे हे व्यसनाधीन होत असल्याचे अभ्यासपूर्वक निरीक्षण नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी नोंदविले आहे. शहरातील कावळे रस्त्यावर, पान टपरीजवळ पडलेले रिकामे सिगारेट पाकीट, सिगारेटची थोटके, पानमसाल्याची पाकिटे चोचीत पकडून मानवाने पक्ष्यांसाठी ठेवलेल्या जलपात्रात ती पाकिटे आणून टाकतात. ती ओली झाल्यावर ते आतील भागातील कागद खातात. त्यांना यातून तंबाखूचा स्वाद मिळत असल्याने ती त्यांच्यासाठी सवय होऊ लागली आहे. तंबाखूचे कण मिसळलेले अशा पात्रातील पाणीही ते पितात. अशी सवय त्यांच्यासाठी घातक ठरणार असून यामुळे त्यांना विविध आजार होवून त्यांचा म़ृत्यू होण्याची भीती प्रा. बोरा यांनी व्यक्त केली आहे.
कावळय़ांची ही कृती धक्कादायक असून यामुळे कावळय़ांना न्युकोटिनचे व्यसन लागल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातही वयस्कर कावळय़ांपेक्षा नवीन पिढीतील कावळे यात आघाडीवर आहेत. त्यांना नक्कीच व्यसन लागले असून त्यांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम होवून त्यांची संख्या कमी होण्याचा धोका आहे. प्रा.आनंद बोरा, अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक