इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि नाशिक डेर्मेटोलॉजीस (त्वचारोगतज्ज्ञ) असोसिएशन यांच्यातर्फे ११ व १२ डिसेंबर या कालावधीत ‘क्युटिकॉन २०१५’चे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये प्रथमच हे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे.
याबाबतची माहिती डॉ. दीपक केतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल एक्स्प्रेस इन येथे हे अधिवेशन होणार आहे. परिषदेत त्वचारोगाचे विविध प्रकार, त्यावरील आधुनिक उपचार पद्धती याविषयी देश आणि विदेशातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्याख्याने दिली जाणार आहेत. तसेच चर्चासत्रदेखील आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्रात त्वचारोगाबरोबरच सौंदर्यशास्त्र, केस, नखांच्या विविध समस्यांवरदेखील चर्चासत्रे होतील. पहिल्या दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजता डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दृकश्राव्य चर्चेद्वारे त्वचेसंबंधीच्या विविध विकारांवर आधुनिक पद्धतीने होणाऱ्या शस्त्रक्रिया आणि उपचार दाखवले जाणार आहेत. त्यात केशरोपणाच्या प्रात्यक्षिकांचाही अंतर्भाव आहे. त्वचारोग शाखेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता शोधनिबंध सादरीकरण, भित्तिचित्र, वैद्यकीय प्रश्नमंजुषा आदी स्पर्धात्मक उपक्रम राबवले जाणार आहेत.
अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी नऊ वाजता ‘आयएडीव्हीएल’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वेंकटराम मैसू, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीपक पारीख यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप १३ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता थायलंडचे डॉ. प्रवीट, अमेरिकेतील डॉ. रोबेर्ट श्वाटर्झ, डॉ. टोबी मोरर तसेच डॉ. रामम, डॉ. किरण गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
या संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. रमेश बालाजीवाले (९४२३१ ७३००१), प्रसाद गर्भे (८८०५७ ०११४२) यांच्याशी संपर्क साधावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा