नाशिक : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपायोजना हाती घेण्यात येणार असून त्याचाच भाग म्हणून येत्या काळात ग्रामीण भागातील शाळांना शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अचानक भेटींचे सत्र सुरू झालेले दिसेल, असा दावा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव येथे व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शालेय शिक्षण मंत्रीपद जाहीर झाल्यानंतर भुसे यांचे मालेगाव येथे आगमन झाल्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत शिक्षण मंत्री म्हणून आपल्या कामाची पद्धत कशी राहील, याचे सुतोवाच भुसे यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे आणि त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा म्हणून शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून धोरण आखण्यात येईल. ग्रामीण भागात शिक्षकांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले. आरोग्य व शिक्षण या दोन्ही क्षेत्रात भरीव कार्य व्हावे,असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. त्याच दृष्टिकोनातून आपल्यावर विश्वास ठेवत शिक्षण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. शिंदे यांनी टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवला जाईल, असेही भुसे म्हणाले.

हेही वाचा…आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश निकम, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) जिल्हाप्रमुख संजय दुसाने, मनोहर बच्छाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) तालुका अध्यक्ष किशोर इंगळे, रिपाइंचे भारत जगताप, भारत चव्हाण,सुनील देवरे, नंदूतात्या सोयगावकर आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dada bhuse claimed surprise visits by officials to rural schools will improve educational standards sud 02