मालेगाव : अटकेत असलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयीन प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. हे सर्व आरोप खोटे असून आपली बदनामी करणारे असल्याचा आक्षेप घेत याप्रकरणी भुसे यांनी अंधारे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
नाशिकमध्ये अमली पदार्थ निर्मिती आणि त्याची बिनदिक्कतपणे तस्करी होत असल्याचे उघडकीस आल्यावर खळबळ उडाली. या विषयावरून विरोधकांनी महायुती शासनाच्या कारभारावर सडकून टीका सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी भुसे यांनीच दबाव आणल्याचा सूर लावत त्यांच्या फोनची माहिती तपासावी, अशी मागणी केली. अंधारे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विविध वर्तमानपत्रांमध्ये याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांमधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला संरक्षण दिल्याचे भासविण्याचा प्रयत्न करून आपली बदनामी करण्यात आल्याचा भुसे यांचा आक्षेप आहे. याबद्दल भुसे यांच्या वतीने ॲड. सुधीर अक्कर, ॲड. योगेश निकम यांनी अंधारे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा – आशा गटप्रवर्तकांचा धुळ्यात मोर्चा
हेही वाचा – धुळेकरांना आता दोन दिवसाआड पाणी ; डाॅ. सुभाष भामरे यांचा दावा
अंधारे यांनी या आरोपांविषयी तीन दिवसांत पुरावे द्यावेत किंवा माफी मागावी, अन्यथा मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. दाभाडीच्या गिरणा साखर कारखाना खरेदीच्या नावाने १७८ कोटींचा घोटाळा केल्याची बातमी प्रसिद्ध केल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध भुसे यांनी यापूर्वीच मालेगाव न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. यासंदर्भात राऊत यांना चार नोव्हेंबरला उपस्थित राहाण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता अंधारे यांनाही तशाच स्वरुपाची नोटीस भुसे यांच्या वतीने देण्यात आली आहे.