मालेगाव: शिक्षण विभागाच्या चौकशीत नियमबाह्य भरती प्रक्रिया राबविल्याचे स्पष्ट झाल्याने महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या शिक्षण संस्थांच्या विश्वस्तांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यात पालकमंत्री दादा भुसे यांचे षडयंत्र असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशी सर्व वस्तुस्थिती असताना लोकांची दिशाभूल करत खोटी सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न हिरे कुटुंब आणि त्यांच्या समर्थकांकडून होत असल्याची टीका भुसे समर्थकांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या दोन्ही शिक्षण संस्थांनी नोकर भरती करताना बनावट कागदपत्रांच्या आधारे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मान्यता मिळवली. शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी या संस्थेचे पदाधिकारी माजी मंत्री पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे, अपूर्व व अद्वय हिरे, तत्कालिन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्यासह एकूण ९७ जणांविरुध्द नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय गेल्या सहा महिन्यात हिरे कुटुंबियांविरुध्द फसवणुकीचे किमान ३० गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. हे सर्व गुन्हे दाखल करण्यामागे दादा भुसे यांचा राजकीय आकस व द्वेष भावना कारणीभूत असल्याचा हिरे व त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे. त्यावरुन भुसे यांच्या निषेधार्थ मालेगावात मोर्चाही काढण्यात आला होता. वयाची नव्वदी उलटलेल्या पुष्पाताई हिरेंसारख्या वृध्द महिला नेत्याविरुध्दही गुन्हा दाखल झाल्यामुळे भुसे यांची राजकीय पातळी किती खालावली,अशी टीकादेखील हिरे समर्थक करत आहेत.

हेही वाचा… दिवाळीत कांदा लिलाव बंदची शेतकरी, ग्राहकांनाही झळ

हिरे समर्थकांच्या या टिकेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. संजय दुसाने, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, माजी उपमहापौर नीलेश आहेर,प्रमोद पाटील, मधुकर हिरे, राजेश गंगावणे या भुसे समर्थकांनी पत्रकार परिषद घेत हिरे कुटुंबियांच्या शिक्षण संस्थांमध्ये किती बेकायदेशीर कामे सुरु आहेत,हे सांगण्याचा प्रयत्न केला. भुसे यांनी केलेल्या तक्रारीनुसार शिक्षण विभागातर्फे चौकशी करण्यात आली. चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर गुन्हे दाखल झाले आहेत. संस्था अध्यक्ष या नात्याने पुष्पाताई हिरे यांचे नाव त्यात आले, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. नोकरीसाठी फसवणूक झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी पोलिसात तक्रारी दिल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

आदिवासी सेवा समिती व महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थांच्या स्थापनेत मोठे योगदान असणारे बोवा दादा यांच्यासह अन्य विश्वस्तांच्या वारसांना बेदखल करत केवळ हिरे घराण्याने या संस्थांवर कब्जा केला, १३६ एकर जमीन देणाऱ्या दानशुरांचा एकही वारस विश्वस्त मंडळात नाही, मालेगाव बाहेरच्या बऱ्याच विश्वस्तांची या संस्थांवर वर्णी लावण्यात आली, असा तक्रारींचा पाढा यावेळी वाचण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dada bhuses supporters criticized the hire family desperate attempt to gain false sympathy by misleading the people in the illegal recruitment process case malegaon dvr
Show comments