नाशिक – उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा कमी होऊ लागला आहे. मार्चच्या प्रारंभीच जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांतील जलसाठा ५९ टक्क्यांवर आला आहे. १५ धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक तर नऊ धरणात त्यापेक्षा कमी जलसाठा आहे. येवला तालुक्यातील तीन गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

पाऊसमान चांगले राहिल्याने यंदा धरणांमध्ये तुलनेत अधिक पाणी आहे. मागील वर्षी मार्चच्या प्रारंभी धरणांमध्ये २६ हजार २२८ दशलक्ष घनफूट म्हणजे ३९ टक्के जलसाठा होता. यावर्षी हे प्रमाण ३९ हजार १७३ दशलक्ष घनफूट इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के अधिक जलसाठा आहे. यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाला करणे शक्य झाले. नाशिक शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४१७६ दशलक्ष घनफूट (७४ टक्के) पाणी आहे. मागील वर्षी त्यामध्ये या काळात ५७ टक्के पाणी होते. शहरात पाणी कपातीची वेळ येते की काय, अशी साशंकता होती. महानगपालिका प्रशासनाने त्या दृष्टीने हालचाली केल्या होत्या. परंतु, निवडणूक काळात तसा निर्णय घेणे राजकीय दबावामुळे महानगरपालिकेला घेता आला नाही. या उन्हाळ्यात तसा विचार करावा लागणार नाही. मनपाच्या मागणीनुसार पाणी आरक्षित करण्याची तयारी पाटबंधारे विभागाने दर्शविली आहे.

धरणात पाणी असले तरी दुर्गम आणि अवर्षण क्षेत्रात नेहमीप्रमाणे टंचाईच्या झळा बसणार आहे. प्रामुख्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांतील काही गावांना, वाड्यांना दरवर्षी उन्हाळ्यात टंचाईला तोंड द्यावे लागते. येवला तालुक्यातील आहेरवाडी, भुलेगाव, आडसुरेगाव या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

धरणसाठ्याची स्थिती

गंगापूर – ४१७६ दशलक्ष घनफूट (७४ टक्के), काश्यपी – १७२७ (९३), गौतमी गोदावरी – ३५९ (१९), आळंदी – (५१), पालखेड – १७५ (२६), करंजवण – ३६०८ (६७), वाघाड १०१३ (४४), ओझरखेड १४६२ (६८), पुणेगाव – ३०७ (४९), तिसगाव – २५२ (५५), दारणा – ५१७७ (७२), भावली – ५५६ (३८), मुकणे – ४४९८ (६२), वालदेवी – ९३८ (८२), कडवा – ६९५ (४१), नांदुरमध्यमेश्वर – २५३ (९८), भोजापूर – ४० (११), चणकापूर – १५८५ (६५), हरणबारी- ८५७ (७३), केळझर – ३७६ (६५), नागासाक्या – १७२ (४३), गिरणा – ९२०४ (४९), पुनद – १०४१ (७९), माणिकपुंज – २८० (८३ टक्के) असा जलसाठा आहे.

Story img Loader