जळगाव – शहरासह जिल्ह्यात आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील कपाशीसह मका, सोयाबीन यांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सोमवारीही वादळी पाऊस सुरु राहिला. पावसामुळे जिल्ह्यातील जळगावसह चाळीसगाव, पारोळा, भडगाव, अमळनेर, पाचोरा, एरंडोल, चोपडा, रावेर, यावल आदी तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. कृषी विभागातर्फे नुकसानग्रस्त शेतीपिकांच्या पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी लोकसत्ताला सांगितले.
सप्टेंबरमधील १८ दिवसांत जिल्ह्यात १६१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजून या महिन्याचे १२ दिवस बाकी आहेत. पावसामुळे खरीप हंगामाला सलग चौथ्या वर्षी फटका बसला आहे. कापूस वेचणीसाठी वाफसाही मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पावसामुळे शेतातच कापूस खराब होत असल्याचे चित्र आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे कापूस लाल पडत आहे, तर अनेक भागांत पावसासोबत वाराही असल्याने मका पूर्णपणे आडवा झाला आहे. सप्टेंबरमध्ये ऐन पीक काढण्याची वेळ असतानाच जोरदार पाऊस होत असल्याने खरीप हंगामात २०१९ ते २०२२ पर्यंत म्हणजेच सलग चार वर्षांपासून २० ते ३० टक्के नुकसान होत आहे. यंदा यावल तालुक्यात ६६७ मिलिमीटर, जळगावात ६५५, रावेरला ६५१, चोपड्यात ६४७ तर चाळीसगाव तालुक्यात ६३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा >>> सर्व महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
एरंडोल तालुक्यात शेतांमध्ये पाणी
एरंडोल तालुक्यात आठ ते १० दिवसांपासून पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पिके सडत आहेत. शेतकर्यांनी साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. पाणी साचले असेल तर ते पाणी बाहेर काढावे, असे आवाहन कृषी विभागतर्फे करण्यात आले आहे. मेमध्ये लागवड झालेल्या कपाशीची बोंडे सडत आहेत. नंतर लागवड झालेल्या कपाशीची फुलपाती गळत आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसामुळे कपाशीसह मका, सोयाबीन यांसारख्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. कापसासह मक्याच्या उत्पादनात काही प्रमाणात घट होऊ शकते, अशी भीती शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. तालुक्यात खरिपाचे क्षेत्र सुमारे ३५ हजार हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे आहे. त्यापाठोपाठ मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे मक्याचे पीक पिवळे पडत आहे. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनावर पावसामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा >>> नाशिक : पुलावरुन तोल गेल्याने युवती दुचाकीसह पाण्यात गेली वाहून
सरसकट पंचनामे करा – आमदार पाटील
अमळनेर मतदारसंघातील शेळावे मंडळात ढगफुटीसमान पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचा खरीप हंगाम हातातून गेला असून, राज्य शासनाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.