नाशिक: इगतपुरी तालुक्यात ऐन भात सोंगणीच्या हंगामात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने भात शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत असून शेतात उभे पीक आणि सोंगून ठेवलेले भात पीक पाण्यात भिजल्याने अतोनात नुकसान झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी भात पिकाला चांगला भाव मिळत असताना अवकाळी पावसाने हातात आलेला घास हिरावला आहे.
सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने भात पीक उदध्वस्त झाले. टोमॅटो पिकाचेही नुकसान झाले असून जनावरांसाठी राखून ठेवलेला चाराही पाण्यात गेला आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद, धामणगाव, भरवीर, साकुर फाटा तसेच उत्तर-पूर्व भागातील नांदगाव बुद्रुक, अस्वली स्टेशन, कुऱ्हेगाव, गोंदे दुमाला, धामणी, बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, टाकेद तसेच पश्चिम भागातील वाडीवऱ्हे, मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव या परिसराला रात्रभर पावसाने झोडपून काढल्यानंतर सोमवारी दुसऱ्या दिवशी दुपारी एकपासून पाऊस पुन्हा सुरु झाला.
हेही वाचा… दरोडेखोरांनी अपहरण केलेल्या साक्रीतील युवतीचा शोध
त्यामुळे शेतात काम करण्याची संधीच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तालुक्यात काही ठिकाणी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, उपसभापती शिवाजी शिरसाठ यांनी केली आहे.