नीलेश पवार, लोकसत्ता
नंदुरबार: नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या तापी नदीवरील सारंगखेडा पुलाला रविवारी दुपारी भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. दोंडाईचाकडील बाजूने पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा भराव वाहून गेल्याने रस्त्याला तडे देखील पडले आहेत.
तापी नदीवर सारंगखेड्याजवळ शंभरपेक्षा अधिक वर्ष जूना पूल आहे. या पुलामुळे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला जोडण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील टाकरखेडाच्या बाजूने रविवारी पुलाचा भराव खचून वाहून गेल्याने पुलाला खड्डे पडले. याच्या लगतच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. धोका लक्षात येताच गावकऱ्यांनी पुलावरची वाहतूक स्वत:हून बंद केली.
आणखी वाचा-नाशिक शहरात ५३४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी
जवळपास तासभर याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना काहीही माहिती नव्हती. पोलिसांनी शहाद्याहून येणारी वाहतूक अनरद बारी आणि दोंडाईचाहून येणारी वाहतूक नंदुरबार चौफुलीमार्ग वळवली. तीन वर्षापूर्वी महामार्ग विभागाने या पुलाची पाहणी करुन दुरुस्ती केली होती. सध्या मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु असल्याने सारंगखेडा बॅरेजमधून तापी नदीपात्रात विसर्ग सुरु आहे.