नाशिक – राजकीय पाठबळामुळे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत पाच वर्षांनंतर झालेला आवाजाच्या भिंतींचा दणदणाट आणि प्रखर प्रकाशझोताने (लेझर किरण) कान, डोळ्यांच्या गंभीर व्याधींना निमंत्रण दिल्याचे उघड झाले आहे. प्रकाशझोतांची तीव्रता इतकी होती की, काहींच्या दृष्टीपटलावर आघात होऊन रक्त साकळले. भाजल्यासारख्या जखमा झाल्या. यामुळे सहा युवकांची अचानक दृष्टी कमी झाली. कर्कश आवाजाचा छातीवर भार पडत असतानाही काही जण लहानग्यांना घेऊन नाचले. त्या आवाजाने अनेकांच्या कानांच्या पडद्याला इजा झाली, छिद्र पडल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या आवाजाच्या भिंती, प्रखर प्रकाशझोताने हे घडले, ती व्यवस्था करणारी सर्व बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित मंडळे आहेत. काही वर्षांपासून गणेशोत्सवात आवाजाच्या भिंती उभारण्यास व गुलालाच्या वापरास प्रतिबंध होता. यंदा पालकमंत्री दादा भुसे यांनी ध्वनि प्रदूषणाच्या नियमांचे पालन करून वाद्यांना परवानगी दिल्यामुळे राजकीय नेत्यांशी संबंधित मंडळांमध्ये आवाजाच्या भिंती उभारण्याची स्पर्धा लागली होती. त्या जोडीला प्रखर प्रकाशझोताच्या दिव्यांची सांगड घातली गेली. प्रखर प्रकाशझोतांनी डोळे दीपण्याची वेळ आली. या व्यवस्थेने हजारोंची गर्दी जमली. मात्र तीच डोळे, कान या नाजूक अवयवांसाठी अपायकारक ठरली.

हेही वाचा – नाशिक: शैक्षणिक कामांविरोधात प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन

तीन ते चार दिवसांत अकस्मात दृष्टी कमी झाल्याचे सहा ते सात रुग्ण आढळल्याचे रेटीना तज्ज्ञ डॉ. गणेश भामरे, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सचिन कासलीवाल यांनी सांगितले. हे सर्व रुग्ण २० ते ३० वयोगटातील असून त्यांच्या डोळ्यांना बाह्य स्वरुपात इजा किंवा तक्रारी नव्हत्या. सखोल नेत्र तपासणीअंती त्यांच्या दृष्टीपटलावरील केंद्रबिंदूवर रक्त साकाळणे व भाजल्यासारख्या जखमा असल्याचे दिसले. मिरवणुकीतील प्रकाशझोताच्या ते संपर्कात आले होते. त्यांचे डोळे दुखत नव्हते. केवळ त्यांची नजर कमी झाली होती. हिरव्या आणि लाल रंगाच्या प्रकाशकिरणांमुळे डोळ्याच्या केंद्रबिंदूतील रक्त वाहिन्यांमधून रक्तस्त्राव झाला. प्रत्येक रुग्णांत लेझरची तीव्रता कमी-अधिक होती. कुणाला डोळ्याच्या पडद्यावर खोलवर, कुणाला पडद्यापर्यंत तर कुणाला वरील भागात इजा झाली. संबंधितांची दृष्टी पूर्णपणे परत येणे अवघड असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. नाशिकसह धुळे नंदुरबार, पुणे आणि मुंबईत डोळ्यांना इजा झाल्याचे कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळल्याचे नाशिक नेत्रविकार तज्ज्ञ संघटनेने म्हटले आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी ध्वनि प्रदूषण नियमांचे उल्लंंघन करणाऱ्या सहा मंडळांचे अध्यक्ष, आवाजाची भिंतीची यंत्रणा हाताळणारे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

कानाच्या पडद्यांना इजा

विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या भिंतींचा आवाज १०० डेसिबलहून अधिक असल्याचा अंदाज आहे. मिरवणुकीनंतर पडदा फाटणे, पडद्याला छिद्र पडणे, कानातून प्रतिध्वनीसारखे आवाज, चक्कर येणे अशा रुग्णांची संख्या वाढल्याचे कान, नाक आणि घसा तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. मुकेश मोरे यांनी सांगितले. तीव्र आवाजाने काहींना जागेवर तात्पुरती चक्कर आली होती. कमी ऐकू येऊ लागले.

तपासणीअंती संबंधित युवकांच्या कानाच्या पडद्यांना छिद्र पडल्याचे दिसले. अशा रुग्णांनी तत्काळ उपचार घेतल्याने काहीअंशी दोष निवारण करता आले. उपचार घेण्यात विलंब झाल्यास अशा रुग्णांना कायमस्वरुपी बहिरेपणा येऊ शकतो, असे डॉ. मोरे यांनी नमूद केले.

कायद्याने मनाई गरजेची – डाॅ. प्रसाद कामत

लेझरमुळे डोळ्यांना होणाऱ्या जखमांबाबत माहिती देताना रत्नागिरीतील इन्फिगो आय हॉस्पिटलचे प्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत यांनी, विशिष्ट फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त तीव्रतेचे लेझर डोळ्यातील रेटिनावर पडले तर तो भाग भाजला जातो आणि रक्तस्राव होतो, असे सांगितले. गेल्या वर्षी कोल्हापुरातील मिरवणुकीत तब्बल ३६ जणांना असा त्रास झाला. ‘इंडियन जर्नल ऑफ ऑफ्तॉल्मॉलॉजी’ या नियतकालिकातही त्याबाबत माहिती प्रसिद्ध झाली आहे. अशा जखमा हळूहळू भरून येतात. पण रेटिनाच्या केंद्र भागात या लेझरचा झोत पडला तर किमान ४० ते ५० टक्के दृष्टी जाते आणि एरवीही काही प्रमाणात तरी कायमची इजा होते. रेटिनाच्या कडेच्या भागात या लेझरमुळे इजा झाली तर लगेच लक्षातही येत नाही. कालांतराने मात्र त्यातून कायमचा दृष्टीदोष निर्माण होतो. लेझरमुळे इजा होऊनही नोंद न झालेले रुग्ण राज्यातील निरनिराळ्या भागांमध्ये असू शकतात. कारण जखम तीव्र नसेल तर गांभीर्य लक्षात येत नाही. म्हणून गणेश विसर्जनच नव्हे, तर कोणत्याही कार्यक्रमात विशिष्ट फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त तीव्रतेचे लेझर वापरण्यास कायद्याने मनाई होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. कामत यांनी व्यक्त केले. ‘इन्फिगो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी, रत्नागिरी जिल्ह्यात मिरवणुकांमध्ये लेझरच्या वापराविरोधात रुग्णालयातर्फे जनजागृती सुरू केली असल्याचे सांगितले.

हेही वाचा – नाशिक: कांदा कोंडी फुटली; व्यापाऱ्यांचा संप मागे

हेच मी बोललो असतो तर वेगळा रंग दिला गेला असता – छगन भुजबळ

प्रखर दिव्यांच्या प्रकाशझोताने (लेझर) गणेश विसर्जन मिरवणुकीत डोळ्यांना त्रास होतो. आवाजाच्या भिंतींमुळे कानांनाही त्रास होतो. पोलिसांनी गणेश मंडळांकडून ध्वनी मर्यादेचे हमीपत्र घेऊनही त्याचे पालन केले जात नाही. याबाबत राज ठाकरे यांनी मांडलेल्या मताचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी समर्थन केले. राज ठाकरे यांनी मांडलेले मत योग्यच आहे. आपण आधी हे बोललो असतो तर त्याला जातीधर्माचा रंग दिला गेला असता, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage to the eyes due to laser rays and damage to the ears due to noise incidents of immersion procession in nashik ssb
Show comments