नाशिक : कुंभमेळ्यापूर्वी कुठल्याही परिस्थितीत गोदावरी स्वच्छ करण्यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनात उपनद्यांतील दूषित पाणी बंधाऱ्याद्वारे अडवून ते प्रक्रिया केंद्रात नेण्याची दुसरी पर्यायी योजना आखण्यात येत आहे. अन्य मार्गाने नदीत मिसळणारे सांडपाणी प्रतिबंधित केले जाणार आहे. सिंहस्थात गोदावरी प्रवाही ठेवण्यासाठी गंगापूर धरण समूहात पाणी आरक्षित केले जाणार आहे.
प्रयागराज कुंभमेळ्यात भाविकांच्या उसळलेल्या गर्दीमुळे २०२७ मध्ये गोदाकाठी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनात मोठे फेरबदल होत आहेत. प्रयागराज कुंभमेळ्यात प्रदूषित पाण्यावर बरीच चर्चा झाली. नाशिकमधून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा विषयही अनेक वर्षांपासून गाजत आहे. कुंभमेळ्यात गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध पातळीवर नियोजन प्रगतीपथावर आहे. महानगरपालिकेने दोन नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अस्तित्वातील नऊ केंद्रांच्या नुतनीकरणासाठी सुमारे दीड हजार कोटींची जागतिक निविदा काढली आहे. या माध्यमातून विनाप्रक्रिया सांडपाणी नदीत मिसळू नये, याची दक्षता घेतली जाईल. कुंभमेळ्यास दीड ते पावणेदोन वर्ष राहिल्याने हे काम वेळेत पूर्णत्वास नेण्याचे आव्हान आहे.
गोदावरीच्या नंदिनी (नासर्डी), वरूणा (वाघाडी) अशा काही उपनद्यांमधून सांडपाणी थेट गोदापात्रात मिसळते. त्यास रोखण्यासाठी दुसरी (ब) योजना तयार केली जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. दरम्यान, गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी यापूर्वीच दाखल याचिकेत उच्च न्यायालयाने विविध निर्देश दिले आहेत.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी दोन योजनांची आखणी करण्यात आली आहे. सर्व भाविकांना स्नान करता यावे म्हणून अस्तित्वातील घाटांची लांबी वाढवून तपोवन, टाकळी, दसक या ठिकाणी नवीन वाढीव घाटांची उभारणी करण्यात येणार आहे. नंदिनीसारख्या उपनद्यांचे पाणी बंधाऱ्याद्वारे अडवले जाईल. तिथून हे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेले जाईल. प्रक्रिया केंद्रांची क्षमता संपल्यास हे पाणी शहराच्या हद्दीबाहेर ओढा गावाच्यापलिकडे सोडण्याचे नियोजन आहे. -डॉ. प्रवीण गेडाम (विभागीय आयुक्त, नाशिक)