लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : संततधारेने शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून प्रमुख मार्गांसह रहिवासी भागातील अंतर्गत रस्तेही खड्डेमय झाले आहेत. याआधी पेव्हर ब्लॉकचे तुकडे, खडीने बुजविलेले बहुसंख्य खड्डे पुन्हा उघडे झाले असून तिथे खड्डे आणि पसरलेले तुकडे, खडी असा दुहेरी त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. तशीच स्थिती जलवाहिनी वा तत्सम कामांसाठी खोदून बुजविलेल्या रस्त्यांवर आहे. पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने लहान-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यात चकचकीत दिसणाऱ्या रस्त्यांचे स्वरुप पावसाळ्यात पूर्णत: पालटले आहे. यंदाच्या हंगामात पावसाने अधूनमधून विश्रांती घेत हजेरी लावली. त्यामुळे महापालिकेला खड्डे बुजविण्यास थोडाफार वेळ मिळाला. परंतु, पाच दिवसांतील पावसाने तात्पुरती मलमपट्टी धुवून निघाली. या खड्ड्यांसह अनेक भागात नव्या खड्ड्यांची मोठ्या प्रमाणात भर पडल्याचे चित्र आहे. खड्ड्यांना नवीन-जुने रस्ते असा काही अपवाद नाही. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. खड्ड्यांमुळे अनेक भागात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

आणखी वाचा- यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

कोट्यवधी रुपये रस्त्यांवर दरवर्षी खर्च केले जातात. तशीच रक्कम खड्डे बुजविण्यावर खर्च होत आहे. तथापि, वाहनधारकांना खड्डेमुक्त रस्त्यांचे दर्शन घडणे दुर्लभ झाले आहे. भगूर येथे नगरपालिकेने खोदलेल्या खड्ड्यात एका वाहनधारकाचा पडून मृत्यू झाला. याआधी शहरात पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढते. काही जखमी होतात तर, काहींना प्राण गमवावे लागल्याची उदाहरणे आहेत. असे असूनही रस्ते सुस्थितीत राखण्यात महापालिकेला अपयश आल्याची सार्वत्रिक भावना आहे.

खड्ड्यांच्या विषयावर मागील वर्षी माजी महापौर दशरथ पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अलीकडेच त्यांनी शहरातील रस्त्यांचा पंचनामा केला. विविध भागातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिकांशी चर्चा केली. या पाहणीत बहुसंख्य रस्ते खड्डेमय झाल्याचे उघड झाले. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचते. गटारीचे पाणी रस्त्यांवर येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचे पाटील यांनी सांगितले. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढला आहे. या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडण्याची तयारी पाटील यांनी केली आहे.

आणखी वाचा-तीन मिनिटात होणाऱ्या कामासाठी ३० तास, महावितरणच्या बेपर्वाईचा वृद्धेला मनस्ताप

मनपाचा तक्रारीसाठीचा क्रमांकही अधांतरी?

पावसाळ्याच्या सुरुवातीला महापालिकेने खड्ड्यांविषयी नागरिकांना तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. यासाठी दिलेला क्रमांक सुरू आहे की नाही, याविषयीच तक्रारी आहेत. तिथे संपर्क साधल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांना तक्रार देण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर किती तक्रारी येतात, याची स्पष्टता नाही. महापालिकेने पावणेतीन महिन्यात बुजविलेल्या खड्ड्यांची संख्या गुलदस्त्यात आहे. या संदर्भात शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Danger of accidents in nashik due to potholed roads mrj