लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: पंचवटीतील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील मिरची हॉटेल चौकात गतवर्षी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व प्रमुख चौक व अपघातप्रवण क्षेत्रातील वाहतुकीला अडथळा ठरणारी पक्की बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्व प्रमुख चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारी पक्की बांधकामे व टपऱ्या व तत्सम अतिक्रमणे हटविण्यासाठी त्यांचे रेखांकन होणे आवश्यक आहे. तथापि, मनपाचा नगरनियोजन विभाग सहा महिन्यांपासून त्यास टाळाटाळ करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाने वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही रेखांकन झाले नाही. परिणामी, शहरातील अनेक प्रमुख चौक व रस्त्यांवरील अपघाताचे धोके आजही कायम असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मिरची चौकात डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने १३ जणांचा मृत्यू झाला होता. ज्या चौकात हा अपघात झाला, तो विविध अतिक्रमणांनी वेढलेला होता. या अपघातानंतर उपरोक्त ठिकाणी तातडीने काही अतिक्रमणे हटवून चौक मोकळा करण्यात आला. या अपघातानंतर अपघातप्रवण क्षेत्रातील धोके कमी करण्याच्या दिशेने विचार सुरू झाला. त्या अंतर्गत मनपा आयुक्त, उपायुक्त ( अतिक्रमण), शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, नगर नियोजन आदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील निलगिरी बाग, जत्रा हॉटेल चौफुली, नांदूर नाका, पाथर्डी फाटा, बळी मंदिर चौक, तारवालानगर सिग्नल चौक या भागात पाहणी केली. या मार्गावरून दिवस-रात्र अवजड वाहनांची वाहतूक होते. चौकातील अतिक्रमणांमुळे अन्य बाजूने येणारी वाहने दृष्टीपथास पडत नाही. त्यामुळे रात्रीच्या सुमारास यातील काही चौकात वारंवार अपघात झालेले आहेत.
आणखी वाचा-नाशिक: नियम न पाळणारे दुचाकीस्वार गोत्यात
अपघाताचे धोके कमी करण्यासाठी या सर्व प्रमुख चौकातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले गेले होते. तथापि, सहा महिन्यांपासून नगर नियोजन विभागाकडून या भागातील अतिक्रमणे, टपऱ्या, वाहतुकीला अडथळा ठरणारी पक्की बांधकामे याबाबतचा अहवाल अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिला गेलेला नाही. शिवाय, त्यांचे रेखांकन करण्यास नगर नियोजन विभागाकडून कमालीची दिरंगाई केली जात आहे. जानेवारी २०२३ पासून अतिक्रमण निर्मूलन विभाग त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. मागील सहा महिन्यात अनेकदा स्मरणपत्रे पाठवूनही नगर नियोजन विभाग ठिम्म आहे.
सहा महिन्यांपासून चालढकल
नगर नियोजन विभागाने मनपा कार्यक्षेत्रातील सर्व चौकात रस्त्यालगतची अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, टपऱ्या, वाहतुुकीला अडथळा ठरणारे पक्के बांधकाम आदींचा अहवाल सादर करून त्या अनुषंगाने रेखांकन केल्यास पुढील कार्यवाही करणे सुलभ होणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाने स्मरणपत्रात म्हटले आहे. परंतु, सहा महिन्यांपासून रेखांकन केले जात नसल्याने कुठल्याही चौकात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविता आलेली नाही. परिणामी, अपघातप्रवण क्षेत्रात अपघाताचे धोके कायम राहिले आहेत.
आणखी वाचा- नाशिक: सवलत योजनेमुळे महापालिकेला धनलाभ
आठ चौकातील रेखांकन पूर्णत्वास
शहरातील सुमारे सात ते आठ चौकातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांबाबतचा अहवाल नकाशांसह नुकताच अतिक्रमण निर्मूलन विभागाला देण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी रेखांकनही करण्यात आले. उर्वरित १२ ते १३ चौकातील पक्की बांधकामे व अतिक्रमणांची छाननी प्रगतीपथावर आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांची संपूर्ण जागा मनपाच्या ताब्यात नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बांधकामांची मालकी ठरविण्यात बराच वेळ लागतो. ते निश्चित झाल्यानंतर पहिली नोटीस दिली जाते. संबंधितास उत्तर देण्यास अवधी द्यावा लागतो. त्यानंतर दुसरी नोटीस दिली जाते. संबंधित बांधकाम अतिक्रमित आहे हे निश्चित करण्याच्या प्रक्रियेत दोन, तीन महिने जातात. नगर नियोजन विभागाकडून संपूर्ण शहरातील अतिक्रमणांच्या सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. -संजय अग्रवाल (कार्यकारी अभियंता, नगर नियोजन विभाग, महानगरपालिका)