दिशादर्शक फलकांचा अभाव, तुटलेले कठडे अशी स्थिती
वणी : कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंग गडावरील घाटातील बस अपघातास ११ वर्ष पूर्ण होऊन देखील संपूर्ण घाट मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. अपघातस्थळी संरक्षित कठडे करण्यात आले, परंतु १० किलोमीटरच्या मार्गात अनेक धोकादायक वळणावर दिशादर्शक फलकांचा अभाव, जीर्ण लोखंडी कठडे, अर्धवट तुटलेली भिंत अशी दुरावस्था पाहावयास मिळते. या स्थितीमुळे वाहनाद्वारे घाटातील प्रवास ‘भगवती भरोसे’ होत असल्याची भाविकांची भावना आहे.
मुंबई येथील भाविकांच्या बसला जानेवारी २००८ मध्ये घाटातील एका धोकादायक वळणावर अपघात झाला होता. अपघातग्रस्त बस १५० फूट कोसळली. त्यात ५० पेक्षा अधिक भाविक मरण पावले. या पाश्र्वभूमीवर, बांधकाम विभागाने ज्या वळणावर हा अपघात झाला, तिथे संरक्षित कठणे उभारून सुरक्षित वाहतुकीची तजविज केली होती. नांदुरी ते गड हा संपूर्ण घाटमार्ग १० किलोमीटरचा आहे. उपरोक्त अपघात क्षेत्र वगळता इतर धोकादायक वळणांकडे तितक्याच्या गांभिर्याने आजही पाहिले जात नाही. त्यातील अनेक वळणांवर अर्धवट तुटलेल्या अवस्थेत संरक्षक भिंत, गांजलेल्या अवस्थेतील लोखंडी कठडे, धोकादायक वळणावर दिशा दर्शक फलकांचा अभाव, रस्त्याच्या कडेला अस्पष्ट झालेले पांढरे पट्टे यासह अन्य बाबींचा अभाव असल्याने या त्रुटी दुर्घटनेस कारणीभूत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अहिवंतवाडी घाटात २००७ मध्ये खासगी बसला अपघात होऊन जवळपास ३९ भाविक मरण पावले होते. त्यानंतर २००८ मध्ये मुंबई येथील भाविकांच्या बसला घाटातील धोकादायक वळणावर अपघात झाला होता. मुळात घाट मार्गावर ज्या ज्या ठिकाणी धोकादायक कठडे आहेत, त्यापलीकडे ३०० फूटच्या आसपास खोल दरी आहे.
कठडे मजबूत नसतील, योग्य दिशा दर्शनाची व्यवस्था नसेल, रस्त्यावरील पांढरे पट्टे अस्पष्ट झालेले असतील तर देशभरातून येणाऱ्या वाहनधारकांना घाटाचा अंदाज कसा येईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी राज्यातून तसेच देशाच्या अन्य भागातून कोटय़वधी भाविक येत असतात. मागील घटनांतून बोध घेत प्रशासनाने उपाय योजना राबविण्याची गरज असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सप्तश्रृंगी गडावर कार्यान्वित झालेल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे भाविकांची मांदियाळी होत आहे. घाट मार्गाप्रमाणे गडावर वेगळेच प्रश्न आहेत. ट्रॉलीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलात स्थानिक व्यावसायिकांना नियमांची जंत्री दाखवत कंपनीकडून बोळवण केली जात असल्या कारणाने व्यावसायिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले. इतरांना नियम आणि स्वत: मात्र नियम डावलून बिनभोभाटपणे काम करीत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. व्यापारी संघटनेचे अजय दुबे, व्यावसायिक रामदास बत्तासे यांनी स्थानिक व्यवसाय करणाऱ्यांना उपरोक्त व्यापारी संकुलात व्यवसाय करण्यास जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. हीच अवस्था सप्तश्रृंगी गडावरील देवस्थानच्या बाबतीत आहे. भगवतीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला देवस्थानच्या लाडू प्रसाद वाटप करण्यासाठी एक टेबल एवढी जागा दिली असल्याने प्रसाद वाटपात अडचणी येत आहेत.