नाशिक – महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे शुक्रवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी पहाटे चारपासून रविवारी रात्री नऊपर्यंत भाविकांना मंदिर दर्शनार्थ खुले ठेवण्यात येणार आहे. देवस्थानच्या वतीने गायत्री मंदिराजवळ प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. भाविकांची होणारी गर्दी पाहता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> धुळे महापालिकेतर्फे दंडमाफी योजनेला मुदतवाढ
त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे मंदिराला विद्युत रोषणाईने सजविण्यात येणार आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार-उत्तर आणि पूर्व महाद्वार आदी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नुकत्याच बांधण्यात आलेल्या दर्शन मंडपातून आणि त्याच्या दोन्ही बाजूकडून दर्शन, भाविकांना शुध्द पाणी, तातडीने दर्शन घेणाऱ्यांसाठी देणगी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवानिमित्त तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पं. निलाद्री कुमार यांचे सतारवादन, रात्री साडेसात वाजता ओम नटराज अकॅडमीतर्फे कथक, शनिवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने घोष वादन तसेच सायंकाळी साडेपाच वाजता समूह बासरी वादन, सायंकाळी चंद्रशेखर शुक्ल यांची शिवस्तुती, असे कार्यक्रम होतील. रविवारी सायंकाळी सात वाजता पं. प्रसाद दुसाने यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल. परंपरेनुसार शनिवारी दुपारी तीन वाजता श्री त्र्यंबकराजाची पालखी पारंपरिक मार्गानुसार कुशावर्त कुंडावर पूजनासाठी नेण्यात येईल. सायंकाळी लघुरुद्र अभिषेक होणार आहे. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.