नाशिक – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी खोलवर चर खोदलेला आहे. असे असताना टंचाईच्या सावटात पुन्हा एकदा चर खोदण्याच्या नावाखाली उधळपट्टीचा डाव रचण्यात आल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात महानगरपालिकेचे नुकसान टाळण्यासाठी आयुक्तांनी लक्ष द्यावे, आवश्यकता भासल्यास मनपाच्या यंत्रसामग्रीचा वापर करून धरणातील गाळ काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्यावर तळाकडील पाणी उचलण्यास अडचणी येत असल्याचे दर्शवित दुष्काळी वर्षात नेहमी हा विषय पुढे रेटला जातो. यंदाही मनपाच्या सर्वसाधारण सभेत आलेला हा विषय आयुक्तांनी तूर्तास बाजूला ठेवला आहे. धरणातील मध्य भाग ते जॅकवेलपर्यंत चर खोदण्याच्या कामासाठी निविदा मागविण्याचा हा प्रस्ताव होता.
हेही वाचा >>>दंगली, नक्षली कारवायांमागे विदेशी शक्ती; कैलाश विजयवर्गीय यांचा दावा
या पार्श्वभूमीवर, माजी महापौर दशरथ पाटील यांनी आयुक्तांना धरणातील प्रत्यक्षातील स्थिती छायाचित्राद्वारे मांडून निवेदन दिले आहे. शहराला गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. धरणात जॅकवेल असून तिथे पाणी येण्यासाठी खोलवर चरही खोदलेला आहे. चार वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारे चर खोदण्याच्या नावाखाली उधळपट्टीचा डाव आखला गेला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तेव्हा आपण खोदलेल्या चराचे छायाचित्र पाठवून तत्कालीन आयुक्तांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर चर खोदण्याचा विषय मागे पडला होता. आता पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पुन्हा यात ठेकेदारांची टोळी सक्रिय झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी पाटील यांनी केली. आवश्यकता भासल्यास महापालिकेची स्वत:ची यंत्रणा वापरून गाळ काढण्याचा पर्याय निवडावा, चार वर्षांपूर्वीही अशी सूचना मांडलेली होती, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.