रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेचा उपक्रम

कर्णबधिर विद्यार्थ्यांचा बुद्धय़ांक हा सर्वसामान्य मुलांसारखाच असतो. केवळ त्यांना ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही. त्यासाठी श्रवणयंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ती सुरू ठेवण्यासाठी वारंवार लागणाऱ्या ‘सेल’ अर्थात बॅटरी साधारणत: चार दिवसांत बदलावी लागते. त्यासाठी महिन्याकाठी मोठा खर्च आहे, खर्चामुळे काटकसरीचे धोरण ठेवून ते वापरले जाते. परिणामी, कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा येत असल्याचे लक्षात घेऊन रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेने श्रवणयंत्र सेल बँकेची संकल्पना मांडली आहे.

वास्तविक श्रवणयंत्र कर्णबधिर विद्यार्थ्यांने दिवसभर वापरणे गरजेचे असते. यंत्राला लागणारी चारशे रुपयांची सेलची बॅटरी उतरली की यंत्र बंद पडते. आर्थिक बाबीशी निगडित हा विषय असल्याने पालकही पाल्यांना केवळ शाळेपुरताच या यंत्राचा वापर करण्यास प्राधान्य देतात. रचना विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सेल बँकेची संकल्पना मांडल्याने कर्णबधिर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी आजतागायत राज्यात कुठेही या स्वरूपाची सेल बँक अस्तित्वात नाही. रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्था महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयासाठी प्रारंभी सेल बँक सुरू करत असून टप्प्याटप्प्याने शहरातील कर्णबधिर विद्यार्थी, माजी विद्यार्थी व श्रवणयंत्र वापरणाऱ्या ज्येष्ठांनाही बँकेचा लाभ देण्यात येणार आहे. गंगापूर रस्त्यावरील माई लेले शाळेत एकूण १५० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील शून्य ते पाच वयोगटातील २६ विद्यार्थी शिशू निदान केंद्रात आहेत. श्रवणयंत्र सेल बँकेची संकल्पना या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणाऱ्या अर्चना कोठावदे यांनी मांडली. त्यास संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ मेहता, उपाध्यक्ष राहुल भावे, साहेबराव हेम्बाडे यांनी पाठिंबा दिला. आता या प्रकल्पाच्या समन्वयपदाची जबाबदारी अर्चना कोठावदे यांच्यावर तर प्रकल्पप्रमुख म्हणून तुषार जिंतुरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि स्वावलंबी बनविणे गरजेचे आहे. लेले विद्यालयासह अनेक शाळांत सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांना नियमित अभ्यासक्रम शिकविला जातो. शिष्यवृत्ती, टिळक विद्यापीठाच्या गणित, इंग्रजी अशाही परीक्षा हे विद्यार्थी देतात. क्रीडा, नृत्य आदी कलांमध्ये पारंगत होणारे हे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावरही उभे राहतात. त्यासाठी गरज आहे ती, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची.

ऐकू न येणे हे न दिसणारे अपंगत्व. महागडय़ा श्रवणयंत्राच्या मदतीने ते अपंगत्व घेऊन संबंधित व्यक्ती पुढे मार्गक्रमण करतात. श्रवणयंत्र कार्यान्वित ठेवण्यासाठी दर चार दिवसांची सेल बदलावे लागतात. त्याचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक विद्यार्थी, पालक ते बंद ठेवतात. यामुळे त्यांचे शिक्षणच थांबत असल्याने ही सेल बँक सुरू होत आहे.

श्रवणयंत्राचे महत्त्व

श्रवणयंत्राद्वारे कर्णबधिर विद्यार्थ्यांना काही अंशी ऐकू येते. सभोवतालचे शब्द एकसारखे कानावर पडले की त्यांना संवाद साधण्यात मदत होते. यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांनी हे यंत्र वापरणे गरजेचे आहे. सेलचा खर्च अधिक असल्याने यंत्राचा वापर टाळला जातो. अनेकदा सेल नसल्याने ती बंद असतात. सर्वसाधारण श्रवणयंत्रासाठी (दोन्ही कानांचे मिळून) किमान २५ ते २५ हजार तर अधिकतम ६५ ते ७० हजार रुपये मोजावे लागतात. ती कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्याचा खर्चही मोठा आहे. ही यंत्रणा कार्यान्वित राखणे ही अनिवार्य व महत्त्वाची बाब आहे.

– अर्चना कोठावदे (समन्वयक, श्रवणयंत्र सेल बँक)

दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत सेल

श्रवणयंत्र सेल बँकेद्वारे कर्णबधिर युवकांना कमीत कमी किमतीत सेल उपलब्ध करणे, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत सेल, प्रौढ कर्णबधिरांना सेलचे वितरण, वृद्धत्वामुळे कर्णबधिरत्व आलेल्या ज्येष्ठांनाही मदत करण्याची मुख्य उद्दिष्टे असल्याचे रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेकडून सांगण्यात आले.

संस्थेचे विविध उपक्रम

सामाजिकतेच्या भावनेतून रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेने श्रवणयंत्र सेल बँकेसाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी माजी विद्यार्थ्यांनी असे विविध उपक्रम यशस्वी केले आहेत. वाघेरा येथील आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सौर ऊर्जेवरील प्रकाश यंत्रणा कार्यान्वित केली. शिवाय, त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी संस्थेच्या सदस्यांनी स्वीकारली आहे. संस्थेचे सदस्य निधी संकलित करून हे उपक्रम राबवितात. श्रवणयंत्र सेल बँकेसाठी संस्था आपल्या सदस्यांकडून निधीसंकलन करणार आहे.