नाशिक : ‘निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान’, अशी जाहिरातबाजी करून राज्य सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत असले तरी हा विकासवेग आदिवासी पाडय़ांपर्यंत पोहोचलेला नसल्याचा प्रत्यय मंगळवारी इगतपुरीत आला. प्रसववेदना असह्य झालेल्या गर्भवती महिलेला ग्रामस्थांनी अडीच किलोमीटपर्यंत डोलीने नेले. मात्र, हा कसरतीचा प्रवास आणि दोन रुग्णालयांमध्ये डॉक्टरच उपलब्ध न झाल्याने तिसऱ्या रुग्णालयात दाखल करताना झालेला विलंब यामुळे या महिलेला प्राण गमवावा लागला.

वनिता भगत असे या महिलेचे नाव आहे. इगतपुरीतील तळोघ ग्रामपंचायतीमध्ये जुनवणेवाडीमध्ये त्या राहत होत्या. या आदिवासी वस्तीतील ग्रामस्थांना तळोघ येथे मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अडीच किलोमीटर कच्च्या रस्त्याने पायपीट करावी लागते. हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे. वनिता भगत यांना प्रसवेदना सुरू झाल्याने मंगळवारी रात्री अडीच वाजता नातेवाईकांनी डोलीने अडीच किलोमीटरवरील तळोघपर्यंत नेले. तिथून वाहनाद्वारे इगतपुरी येथील शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. तिथे डॉक्टर उपस्थित नसल्याने वाहनातून पुन्हा वाडीवऱ्हे येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या रुग्णालयात केवळ परिचारिका उपस्थित होत्या. वनिता यांची अवस्था पाहून त्यांनी तिला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले.

वाडीवऱ्हेहून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचेपर्यंत पहाटेचे चार वाजले होते. त्यांच्यावर एक ते दीड तास उपचार करण्यात आले. परंतु, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.वनिता यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी नेतानाही कसरत करावी लागली. नाशिकहून वाहनाद्वारे मृतदेह इगतपुरी तालुक्यात आणण्यात आला. तळोघपासून पुन्हा जुनवणेवाडीपर्यंत नेण्यासाठी डोली करावी लागली. जुनवणेवाडीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने शाळकरी मुले, वयोवृद्ध आणि गर्भवतींचे हाल होतात. त्यामुळे जुनवेणवाडीपर्यंत तातडीने रस्ता करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिताराम गावंडा यांनी केली.

Story img Loader