सुरगाणा तालुक्यातील तातापाणीजवळील साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरल्याने १५ फूटावरुन खडकावर आपटल्याने गुजरातमधील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.बुधवारी सुरत येथील सार्वजनिक काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नाॅलाॅजी महाविद्यालयात दुस-या वर्षात शिकणारा तक्षिल प्रजापती (१८) हा इतर मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीडच्या सुमारास सर्वजण साखळचोंडजवळील वाहूटचोंड धबधब्याच्या ठिकाणी अंघोळ करीत असतांना खडकावर शेवाळ असल्याने तक्षिलचा पाय घसरुन तो कोसळला. खडकावर आपटल्याने डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे जागीच मृत्यू झाला. याबाबत आदिवासी बचाव अभियानाचे कार्यकर्ते रतन चौधरी यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे आणला. पाच वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खोद दरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी नारायण गावित, माजी सैनिक शिवराम चौधरी, साधु गावित, अनिल बागुल, रामदास गावित, जसे तुंबडा, सुरेश चौधरी आदींनी सहकार्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पदवीधर मतदार नोंदणीत पुरूषांची आघाडी; प्रारुप यादीत एक लाख ५५ हजारहून अधिक मतदार

पिंपळसोंड, तातापाणी, उंबरपाडा येथे अंबिकेची उपनदी असलेल्या भुतकुड्यावरर चिंचचोंड, गायचोंड, शेळूणे, साखळचोंड, शाॅवरपाॅंईट, वाहूटचोंड अशा पाच ते सहा साखळी धबधब्यांची मालिका आहे. हा भाग गुजरात सीमेलगतचा घनदाट जंगल व्याप्त आहे. पिंपळसोंड येथे कुंडा रिसोर्ट पर्यटकांना भुरळ घालणारे असल्याने येथे सुटीच्या दिवशी गर्दी असते. हा भाग वनविभागाच्या हद्दीत येतो. वन विभागाने कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. यापूर्वी तत्कालीन उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांनी दोन वेळा धबधब्याची पाहणी केली होती. आराखडा तयार करून सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पुढे काहीच झाले नाही. वनविभागाने सुविधा उपलब्ध कराव्यात- शिवराम चौधरी (माजी सैनिक, पिंपळसोंड)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of a student after falling into the valley amy